भोंदू खरातचं दर्शन घेतल्यापासून चंद्रकांतदादांची बुद्धी भ्रष्ट; धंगेकरांचा जोरदार हल्ला
चंद्रकांत पाटील यांच्या 'आधार-ठसा' विधानावरून राजकीय वातावरण तापले आहे. रवींद्र धंगेकर यांनी पाटील यांच्या बुद्धी भ्रष्टतेवर जोरदार टीका केली, 'लिंगपिसाट खरात' यांच्या दर्शनामुळे त्यांची बुद्धी भ्रष्ट झाल्याचा खोचक टोला लगावला. संजय राऊत यांनीही पाटलांच्या 'संशोधना'ची खिल्ली उडवली.

राज्याचे मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी जंतरमंतरवरील आंदोलनाबाबतचं अजब विधान केलं आहे. जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या तरुणांचे पायाचे ठसे दगडावर उमटले आहेत. त्या ठश्यांना आधारशी लिंक करून त्यांची ओळख पटवली जाणार आहे, असं दिल्ली पोलिसांचं अॅनालिसिस असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं. चंद्रकांतदादांच्या या विधानचा सर्वांनीच समाचार घ्यायला सुरुवात केली आहे. महायुतीतील महत्त्वाचा पक्ष असलेल्या शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर यांनीही चंद्रकांत पाटील यांच्यावर सडकून टीका केली आहे. लिंगपिसाट अशोक खरातचं दर्शन घेतल्यापासून चंद्रकांतदादांची बुद्धी भ्रष्ट झाल्याची खोचक टीका रवींद्र धंगेकर यांनी केली आहे.
शिवसेना नेते रवींद्र धंगेकर यांनी चंद्रकांत पाटील यांना घरचा आहेर दिला आहे. हे कोल्हापुरचं पार्सल आहे. पुढच्या वेळेस पुण्यात राहील की नाही माहिती नाही. पण पुण्याची वाट लावून जाणार आहे. ते अतिशय कपटी आणि दुष्ट आहेत, अशी टीका रवींद्र धंगेकर यांनी केली आहे. अशोक खरात यांच दर्शन घेतल्यापासून त्यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.
चिघळवणे योग्य नाही
चंद्रकांत पाटील यांचे ऑफिस पुणे पोलिसांनी तपासावं. निलेश घायवळचे फिंगर प्रिंट मिळतील, असा चिमटा रवींद्र धंगेकर यांनी काढला. विद्यार्थ्यांचं आंदोलन शांत झालं आहे. विद्यार्थी शांत आहेत. अशावेळी त्यांना चिघळवणे योग्य नाही. पक्ष असतो मात्र पक्षाच्या पुढे ही काही लोकांची आत्मियता असते, असंही त्यांनी सांगितलं.
देश मोठ्या संशोधकाला मुकेल
ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनीही चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली आहे. चंद्रकांतदादांनी अनोखं संशोधन केलं आहे. त्यांच्या या संशोधनाबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची नोबल पुरस्कारासाठी शिफारस केली पाहिजे. त्यांना एखाद्या जागतिक विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू केलं पाहिजे. त्यांना विज्ञानाचा पुरस्कार दिला पाहिजे. त्यांना जर हा पुरस्कार दिला नाही तर देश एका मोठ्या संशोधकाला मुकेल, असा टोला लगावतानाच दादांचा दगडाशी जवळचा संबध आहे, असा चिमटाही राऊत यांनी काढला.
काय म्हणाले चंद्रकांत पाटील?
चंद्रकांत पाटील यांनी काल मीडियाशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी जंतरमंतरवरील आंदोलनावर प्रतिक्रिया दिली होती. दिल्ली पोलीस आणि एका पत्रकाराच्या युट्यूब व्हिडिओचा हवाला देऊन त्यांनी काही विधानं केली होती. ज्या तरुणांनी आंदोलन केलं, त्यांच्या पायाचे ठसे दगडावर आहेत. त्या ठश्यांना आधारशी लिंक करून या विद्यार्थ्यांची ओळख पटवली जाणार आहे, असं दिल्ली पोलिसांचं अॅनालिसीस आहे, असं चंद्रकांतदादा म्हणाले होते. त्यावरून दादांवर टीका होत आहे.
