मुंबई : सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बांधकामाच्या दरात म्हाडा (MHADA) घरे उपलब्ध करून देत असून म्हाडा आणि सिडकोच्या माध्यमातून पोलीस निवासस्थाने तसेच सर्वसामान्यांना परवडणारी तसेच हक्काची घरे देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिली. पुणे मंडळ म्हाडाच्या वतीने बांधण्यात येणाऱ्या 5 हजार 211 घरांच्या सोडतीचा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीद्वारे शुभारंभ करण्यात आला. यावेळी गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, म्हाडाचे उपाध्यक्ष अनिल डिग्गीकर, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पुणे म्हाडा मंडळाच्या 5 हजार 211 सदनिकांसाठी सुमारे 90 हजारांपेक्षा अधिक नागरिकांनी अर्ज केले होते.