Pune Crime News | पुणे शहरात सायबर गुन्हेगारांकडून कोट्यवधींची लूट, प्रथमच आली ही माहिती समोर
Pune Crime News | पुणे शहरात सायबर फसवणुकीच्या घटना सातत्याने वाढत आहेत. सायबर चोरट्यांकडून सर्वसामान्यांचीच नाही तर उच्च शिक्षित लोकांचीही फसवणूक केली जात आहे. यासंदर्भातील माहिती प्रथमच समोर आलीय.
योगेश बोरसे, पुणे | 24 सप्टेंबर 2023 : सध्या ऑनलाईनचा जमाना आहे. मोबाईलच्या माध्यमातून खरेदी होत आहे, बँकेची कामे होत आहे. तसेच वर्क फ्रॉम होम होत आहे. परंतु त्याचा फायदा सायबर गुन्हेगार घेत आहेत. देशभरात जसा ऑनलाईनचा वापर वाढत आहे, तसा सायबर फसवणूक करण्याचे प्रकार वाढत आहे. आयटी सिटी असलेल्या पुणे शहरातही सायबर फसवणुकीत मोठी वाढ झाली आहे. यासंदर्भातील गेल्या आठ महिन्यांची माहिती समोर आली आहे. केवळ आठ महिन्यांत पुणेकरांनी २० कोटींपेक्षा जास्त रुपये सायबर फसवणुकीतून गमावले आहे.
चोरट्यांनी बदले गुन्ह्यांचे स्वरुप
चोरटे स्मार्ट झाले आहे. त्यांनी ऑनालाईन होणारे आर्थिक व्यवहार लक्षात घेऊन गुन्हेगारीचे स्वरुपही बदलले आहे. चोरट्यांनी मोर्चा आता सायबर गुन्हेगारीकडे वळवला आहे. त्यासाठी विविध प्रकारचे आमिष देऊन फसवणूक केली जात आहे. कधी वर्क फ्रॉम होम नोकरीचे आमिष दिले जाते, तर कधी ऑनलाईन पैसे कमण्याचा फंडा दाखवत फसवणूक केली जाते. यामाध्यमातून सर्वसामान्यच नाही तर उच्च शिक्षित लोकांचीही फसवणूक केली जात आहे.
आठ महिन्यांत पुणे शहरात 20 कोटींची फसवणूक
पुण्यात सायबर चोरट्यांचा सुळसुळाट झाला आहे. कोट्यवधी रुपयांची फसवणूक सायबर चोरट्यांकडून केली गेली आहे. केवळ आठ महिन्यांत पुणेकरांनी 20 कोटींपेक्षा जास्त रुपये गमावले आहे. यामध्ये ऑनलाईन टास्क या गुन्ह्यात 20 कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेची फसवणूक झाली आहे. जानेवारी 2023 ते 31ऑगस्ट या आठ महिन्यात 1114 विविध गुन्ह्यांच्या तक्रार पुणे सायबर पोलिसांकडे आल्या.
कोणकोणत्या गुन्ह्यांत झाली फसवणूक
सायबर चोरटे विविध गुन्ह्यात फसवणूक करत आहे. त्यात पैसे ट्रॅन्सफर प्रकरणातील 56 गुन्हे दाखल झाले आहे. तुमची केवायसी अपडेट करावी लागणार असे सांगत 42 जणांची फसवणूक केली आहे. क्रीपटोकरन्सीमधील गुंतवणुकीचे लालच देऊन 58 जणांना गंडवले गेले आहे. इन्शोरन्स पॉलिसीची रक्कम मॅच्युअर झाल्याचे सांगत दहा जणांना फसवले आहे. नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करण्याचे 31 प्रकार घडले आहे. शेअर मार्केट फ्रॉडच्या 27 घटना घडल्या आहेत. कर्ज मिळवून देण्याचे 29 तक्रारी दाखल झाल्या आहेत. ऑनलाईन सेल आणि परचेस फ्रॉडमधून 62 जणांना गंडवले आहे. फेक प्रोफाईलचे 85 तरफेसबुक हॅकिंगच्या 34 घटना घडल्या आहेत. सेक्सटॉर्शनच्या माध्यमातून 35 जणांना फसवले आहे.