बरे झाले ‘पांडुरंगा’, जंबो एकदाचे बंद झाले!

| Updated on: Jan 20, 2021 | 1:23 PM

ऐन कोरोनाच्या काळात पुण्यात 105 कोटी खर्च करुन बांधण्यात आलेलं जम्बो कोव्हिड रुग्णालय बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

बरे झाले पांडुरंगा, जंबो एकदाचे बंद झाले!
Follow us on

पुणे : ऐन कोरोनाच्या काळात पुण्यात 105 कोटी खर्च करुन बांधण्यात आलेलं जम्बो कोव्हिड रुग्णालय बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. उपचार घेणारे शेवटचे काही बाधित रुग्ण बरे होऊन गेल्यानंतर जम्बो कोव्हिड रुग्णालय बंद करण्याचा निर्णय घेतला गेलाल आहे. रुग्णांची हेळसांड, बेडची कमतरता, व्हेंटिलेटर इत्यादी गोष्टींमुळे पुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटर वादच्या भोवऱ्यात अडकलं होतं. टीव्ही 9 मराठीचे पुणे प्रतिनिधी पांडुरंग रायकर यांचा दुर्दैवी मृत्यू याच रुग्णालयात झाला होता. तसंच 250 कोरोना रुग्णही याच रुग्णालयात दगावले. अखेर सोमवारी हे रुग्णालय बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला. (Decision to Closed jumbo Covid Center In Pune)

एप्रिल-मे 2020 मध्ये महाराष्ट्रात सगळ्यात जास्त पुणे शहरात कोरोनाने रौद्र रुप धारण केलं होतं. पुण्यात दररोज जवळपास 2 हजारहून अधिक रुग्ण मिळत होते. अशा काळात पुणे शहरातील आरोग्य व्यवस्था ढासळली होती. रुग्णांना बेड मिळत नव्हते. या सगळ्या पार्श्वभूमीवर सरकारने पुण्यात जम्बो कोव्हिड रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेतला. मोठा गाजावाजा करत सरकारने केवळ 25 दिवसांत पुण्यात जम्बो कोव्हिड सेंटर उभारलं. मात्र काहीच दिवसांत रुग्णालयात रुग्णांची दुर्दशा होऊ लागली. अनेक रुग्णांना नीटपणे उपचार मिळत नसलेल्या तक्रारी सुरु झाल्या.

एक वेळ तर अशी आली की कोव्हिडसाठी उभारण्यात आलेल्या जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये रुग्ण दाखल होण्यास नकार देऊ लागले. दुसऱ्या कोणत्याही रुग्णालयात दाखल करा पण जम्बो कोव्हिड रुग्णालयात नको, अशी विनवणी रुग्ण करु लागले. यावरुन एकंदरित या रुग्णालयातली परिस्थिती लक्षात येईल. असं जरी असलं तरी 1 हजार 911 रुग्णांवर या रुग्णालयात उपचार झाले. यातील 1 हजार 886 जणांना कालच्या तारखेपर्यंत डिस्चार्ज देण्यात आला. तर जवळपास 250 रुग्णांना आपल्या जीवाला मुकावे लागले.

रुग्णांची हेळसांड, बेड-व्हेंटिलेटर कमतरता

कोरोनाचा पीक पिरीयड सुरु असताना मोठा जागावाजा करत बांधलेल्या या जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये रुग्णांना बेडच मिळत नव्हते. जर बेड मिळाले तर व्हेंटिलेटर मिळत नव्हते. एकंदर या रुग्णालयात रुग्णांची प्रचंड हेळसांड होती, अशा बातम्या येत होत्या.

पुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये महिला डॉक्टरचा विनयभंग

जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये एका 25 वर्षीय महिला डॉक्टरचा विनयभंग झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. याच रुग्णालयातील दोन डॉक्टरांनी या महिला डॉक्टराचा विनयभंग केल्याचं समोर आलं होतं.

जम्बो कोव्हिड सेंटरची कोरोनाकाळातली आकडेवारी

दाखल रुग्ण – 1 हजार 911
बरे झालेले रुग्ण- 1 हजार 886
दगावलेले रुग्ण- 250 रुग्ण
(आकडेवारी स्त्रोत- रुबल अग्रवाल- पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त)

पत्रकार पांडुरंग रायकर यांचा दुर्दैवी मृत्यू

टीव्ही 9 मराठीचे पुणे प्रतिनिधी पत्रकार पांडुरंग रायकर यांचा कोरोनाचा संसर्ग झाल्याने त्यांना पुण्यातील जम्बो कोव्हिड रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र ऑक्सिजन पातळी कमी होत गेल्याने, पांडुरंग यांचा लढा अपुरा पडत गेला. त्यांची ऑक्सिजन पातळी घटल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. दुर्दैव म्हणजे पुण्यात व्हेंटिलेटर उपलब्ध होत नव्हते. मध्यरात्री पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात व्हेंटिलेटर असल्याची माहिती मिळाल्यानंतर, पांडुरंग यांना मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्याच्या हालचाली केल्या. मात्र धक्कादायक म्हणजे जम्बो कोव्हिड सेंटरमधून मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यासाठी अ‍ॅम्ब्युलन्सच मिळाली नाही. जेव्हा अ‍ॅम्ब्युलन्स उपलब्ध झाली, तोपर्यंत उशिर झाला होता. लढवय्या पांडुरंग यांना तोपर्यंत देवाज्ञा झाली होती.

(Decision to Closed jumbo Covid Center In Pune)

पुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये महिला डॉक्टरचा विनयभंग, दोघा डॉक्टरांवर गुन्हा

पुण्यात कोरोनाबाधितांच्या अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमींच्या संख्येत वाढ, माजी महापौरांच्या निधनानंतर प्रशासनाला जाग

‘पुण्यात यंत्रणेवर कुणाचंही नियंत्रण नाही’, प्रकाश जावडेकर आणि शरद पवारांसमोर आमदार-खासदारांचा तक्रारींचा पाढा

पुण्यातील कोव्हिड परिस्थिती विदारक, कोरोनाग्रस्तांवर उपचारासाठी बेडच नाहीत