
पुणे : पुणे विमानतळाचा (Pune Airport) धावपट्टीच्या विस्तारीकरणाचा प्रलंबित प्रश्न लवकर मार्गी लावा, अशा सूचना शहर विमानतळ सल्लागार समितीचे अध्यक्ष आणि खासदार गिरीष बापट (MP Girish Bapat) यांनी प्रशासनाला दिल्या आहे. गिरीष बापट यांनी अधिकाऱ्यांसोबत नुकतीच बैठक घेतली. या बैठकीत पुणे नागरी संस्था आणि आयएएफ अधिकाऱ्यांना धावपट्टीच्या विस्तारासाठी भूसंपादन (Land acquisition) करण्याकडे गांभीर्याने लक्ष द्या आणि पायाभूत सुविधांची कामे वेळेत पूर्ण करा, असे सांगितले. हा दीर्घकाळ प्रलंबित असलेला मुद्दा आहे. दोन्ही एजन्सी सर्व शक्यतांचा अभ्यास करतील आणि जमीन संपादित करण्यासाठी योग्य पावले उचलतील, असे बैठकीनंतर गिरीष बापट म्हणाले. या प्रश्नासाठी परिसरातील खासगी जमीन मालकांशीदेखील प्रशासनाला, पुणे महापालिकेला बोलावे लागणार आहे. तसेच समन्वयाने हा प्रश्न सोडवावा लागणार आहे.
सध्या 2,530 मीटर लांबीची धावपट्टी पूर्वेकडील 900 मीटर आणि पश्चिमेकडील 250 मीटरने वाढवण्याची योजना आहे. भारतीय हवाई दलाकडे (IAF) 86.53 एकर जमीन आहे आणि दोन्ही टोकांना विस्तारासाठी आणखी 136.8 एकर जमीन आवश्यक आहे. बापट म्हणाले, रनवे वाढवल्यानंतर वाइड-बॉडी विमाने लँडिंग आणि टेक ऑफ करू शकतील. विमानतळाला योग्य रस्त्यांद्वारे जोडण्याबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली.
वीकफिल्ड आणि 509 चौकांजवळील रस्त्यांची रुंदी वाढवण्यासाठी आम्ही पुणे महानगरपालिकेला (पीएमसी) खासगी जमीनमालकांशी बोलण्याची सूचना केली आहे. जमिनीच्या एका मोठ्या तुकड्यावर फुलांची रोपवाटिका आहे. याठिकाणी पुणे महानगरपालिका योग्य समन्वयाने रस्ता सहजपणे रुंद करू शकते, असे गिरीष बापट यांच्या जवळच्या सूत्राने सांगितले आहे. बहुस्तरीय कार पार्किंग हादेखील एक महत्त्वाचा प्रश्न आहे. बांधकामाधीन बहुस्तरीय कार पार्किंगशी संबंधित सर्व अडथळे दूर करण्यात आले आहेत, अशी माहितीही यावेळी गिरीष बापट यांनी दिली आहे.