Jay Pawar: “आईला सांगा रडू नको”, अजितदादांचा आवाज ऐकताच कंठ दाटला, पाणावल्या डोळ्याच्या कडा, आंबेगावच्या देखाव्यात जय पवार भावुक
Jay Pawar Emotional : कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर आंबेगाव येथील ‘अजित सृष्टी’ला जय पवार यांनी भेट दिली. यावेळी लोकनेते अजितदादांच्या आठवणींनी जय पवार भावुक झाले. दादांचा आवाज ऐकताच त्यांना अश्रू अनावर झाले. यावेळी उपस्थितांनाही गहिवरून आले.

विक्रम वारे, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते जय अजितदादा पवार यांनी आज आंबेगाव येथे कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर ‘अजित सृष्टी’ या देखाव्याला भेट दिली. यावेळी अजितदादांचे जुने भाषण तिथे सुरू होते. दादांचा आवाज ऐकताच त्यांना अश्रू अनावर झाले. त्यांना हुंदका आवरता आला नाही. दादांचा आवाज ऐकताच त्यांना आठवणी दाटून आल्या. त्यांचे डोळे पाणावले. यावेळी वातावरण भावुक झाले होते. दादांच्या आठवणीने उपस्थितांनाही गहिवरून आले.
जय पवार भावुक
युवराज बेलदरे यांनी आपल्या गणपतीसमोर लोकनेते दिवंगत अजितदादा पवार यांच्या स्मृतींना आदरांजली अर्पण करण्यासाठी हा भावपूर्ण देखावा उभारला आहे. ‘अजित सृष्टी’च्या माध्यमातून अजितदादांच्या कार्याचा आणि त्यांच्या आठवणींचा जागर करण्यात आला आहे. हा देखावा पाहताना जय पवार यांना अजितदादांच्या अनेक आठवणी जाग्या झाल्या. भावनिक वातावरणात अजितदादांच्या स्मृतींना उजाळा देताना जय पवार यांना आपल्या भावना आवरता आल्या नाहीत आणि ते भावुक झाले.
आईला सांग रडू नको
जय पवार देखाव्याच्या ठिकाणी पोहचले. त्यावेळी अजित पवार यांचे जुने भाषण तिथे सुरू होते. “आई अजून रडत असते का? तिला सांगा रडू नको म्हणून” दादांच्या आवाजातील हे वाक्य कानावर पडताच जय पवार यांना अश्रू अनावर झाले. जणू दादाच थेट संवाद साधत आहेत, असे त्यांना वाटले. या आवाजाने ते स्तब्ध झाले. त्यांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या. त्यानंतर डोळे पुसत त्यांनी गणपतीची आरती केली.
बांधावर जाऊन नुकसानाची पाहणी करा
राज्यातील दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजितदादा पवार यांनी पक्षातील सर्व मंत्री, पालकमंत्री, खासदार, आमदार, माजी आमदार तसेच प्रमुख पदाधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष नुकसानाची पाहणी करण्याचे स्पष्ट व सक्त निर्देश दिले आहेत. नैसर्गिक संकटाच्या काळात शेतकऱ्यांना एकटे सोडू नका. त्यांच्या अडचणी प्रत्यक्ष जाणून घ्या, नुकसानग्रस्त भागांची पाहणी करा आणि आवश्यक प्रशासकीय मदत मिळवून देण्यासाठी तत्परतेने पाठपुरावा करा, अशा सूचना सुनेत्रा पवार यांनी दिल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षातील प्रत्येक पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्ता हा शेतकऱ्यांच्या अडचणीच्या काळात त्यांच्या सोबत आहे, हा विश्वास शेतकऱ्यांमध्ये निर्माण करण्याचे आवाहनही सुनेत्रा पवार यांनी केले.