Ketan-Siya Kundali: केतन-सियाचे जुळले 27 गुण, का जुळले नाही मन? पत्रिकेतील कोणत्या ग्रहाचा दोष?

Ketan Agarwal Lohgad Murder Case: केतन आणि सियाचे लग्नपत्रिकेत 27 गुण जुळले होते. हा आकडा शुभ मानल्या जातो. पण तरीही सियाने प्रियकर चेतनसोबत त्याला मारण्याचा प्लॅन का तडीस नेला असा सवाल अनेकांच्या मनात घोळत आहे. पत्रिकेत दोष नेमका कुठं होता? असा प्रश्नही विचारल्या जात आहे. लग्नावेळी पत्रिकेत काय काय जुळणे गरजेचे मानले जाते?

Ketan-Siya Kundali: केतन-सियाचे जुळले 27 गुण, का जुळले नाही मन? पत्रिकेतील कोणत्या ग्रहाचा दोष?
केतन-सियाचे जुळले 27 गुण, का जुळले नाही मन
Image Credit source: टीव्ही ९ नेटवर्क
| Updated on: Jul 02, 2026 | 4:26 PM

Ketan Agarwal Lohgad Murder Case Kundali: सिया गोयल आणि केतन अग्रवाल यांची लग्नपत्रिका जुळली. 36 पैकी 27 गुण जुळले. हा आकडा विवाहयोग्य मानल्या जातो. साखरपुडाही झाला. नोव्हेंबर 2026 मध्ये लग्नाचा मुहूर्तही शोधला गेला. पण सियाने प्रियकर चेतन चौधरीच्या मदतीने 18 जून रोजीच त्याला लोहगडावरून ढकलत संपवले. आता अनेक जणांच्या मनात प्रश्न घोळत आहे की 27 गुण जुळल्यावर सियाने असे क्रूर कृत्य का केले, याचा शोध सुरू आहे. त्यातून काही दावे-प्रतिदावे करण्यात येत आहे. तिला केतन आवडत नव्हता तर तिने लग्नाला नकार द्यायला हवा होता असे समाजमन सांगत आहे. पत्रिकेत दोष नेमकं कुठं होता, असा प्रश्नही विचारल्या जात आहे.

ज्योतिष शास्त्रात एक गंभीर आणि व्यावहारिक प्रश्न विचारल्या जातो की, अनेक जण पत्रिकेतील गुण जुळले की लग्नास होकार भरतात. पण पुढे त्यांचे वैवाहिक जीवन कटकटीने भरलेले असते. घटस्फोट होतो. वाद होतात. दोघांमध्ये ताळमेळ बसत नाही. अष्टकुट जुळवणे आणि पत्रिका जुळवणे यामध्ये मोठे अंतर आहे. त्यामुळेच केवळ गुण जुळवणे पुरेसे नसते. पत्रिका जुळणे आवश्यक आहे.

अष्टकुट जुळवणी काय?

अष्टकुट जुळवणीमध्ये वर आणि वधूची चंद्र रास आणि नक्षत्राआधारे आठ कूटांचे मूल्यमापन करण्यात येते. यामध्ये वर्ण, वश्य, तारा, योनी, ग्रह मैत्री, गण, भकूट आणि नाडीचे मूल्यमापन करण्यात येते. त्याचे एकूण 36 अंकी गुण असतात. ज्योतिषशास्त्रानुसार, जर 18 गुण जुळले तरी लग्न होऊ शकते. पण पत्रिकेतील उर्वरीत 11 भाव, चंद्रासह इतर 8 ग्रह ज्यामध्ये सूर्य, मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनि, राहु आणि केतूचे बलाबल दुर्लक्षित करून चालत नाही. त्यांचे पत्रिकेतील पारडे महत्त्वाचे असते.

पत्रिकेतील तो दोष देतो मोठे संकेत

लग्न पत्रिका जुळवताना वधू आणि वराची जन्म पत्रिका, नवांश पत्रिका आणि सध्याची ग्रहस्थितीचे विश्लेषण करणे गरजेचे असते. यामध्ये अनेक बारीक सारीक मुद्दे, भाव आणि मतं असतात. विवाह पत्रिकेतील सातवे घर हे जोडीदारांमधील सुसंवाद दर्शवते. आठव्या घरातून वैवाहिक कालावधी, त्यातील सुख-समृद्धी याचे निर्देशन, अंदाज मिळतो. द्वितीय भावातून कुटुंब तर चतुर्थ, चौथ्या भावातून सुख समृद्धी आणि पंचम भावातून संतती सुखाचे संकेत मिळतात.

पुरुषाच्या पत्रिकेत पत्नीचे कारक असलेला शुक्र तर स्त्रीच्या पत्रिकेत पती कारक गुरूची स्थिती आणि या ग्रहांचे मजबूत स्थान महत्त्वाचे मानले जाते. पत्रिकेतील ग्रह स्थिती, भाव स्थिती विवाहाचे भविष्य कथन करते. त्यानुसार मांगलिक दोष, सूर्य-राहू ग्रहण योग, सातव्या स्थानावरील शनि, मंगळ आणि राहू या सारख्या अशुभ ग्रहांचा प्रभाव दर्शवते. जर दोघांच्या पत्रिकेत एकाचवेळी मारक वा अडचणीचा काळ सुरू असेल तर मग जीवनात मोठा संघर्ष उसळू शकतो. मानसिक त्रास होऊ शकतो. वाद होऊ शकतात. लग्न टिकेल की नाही हे पत्रिकेचे सुक्ष्म विश्लेषण, भाव, भावस्थिती, कारक ग्रह आणि ग्रहदशा यांच्यावर अवलंबून असल्याचा दावा करण्यात येतो.

डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती ही ज्योतिषशास्त्रीय ग्रंथावर आधारीत आहे. टीव्ही ९ मराठी या दाखल्यांची पुष्टी करत नाही. याविषयीच्या माहितीसाठी ज्योतिष्यतज्ज्ञांची मदत घेऊ शकता.

Follow Us