BJP MLA Rekha Patra Critical: भाजप आमदार रेखा पात्रा यांची प्रकृती चिंताजनक! व्हेंटिलेटरवर उपचार सुरु; आरोग्यमंत्र्यांची रुग्णालयात धाव
डॉक्टरांच्या मते रेखा पात्रा यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे वैद्यकीय-कायदेशीर अहवालानुसार, रेखा पात्रा यांच्या शरीरात ऑर्गनोफॉस्फोरस-आधारित कीटकनाशकाची विषबाधा झाली आहे.

BJP MLA Rekha Patra Health Update: भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आणि उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील हिंगलगंज मतदारसंघाच्या आमदार रेखा पात्रा यांची प्रकृती गंभीर असल्याचे समोर आले आहे. रेखा पात्रा यांची तब्येत बिघडल्याने त्यांना तातडीने कोलकातामधील मुकुंदपूरमधील आर. एन टागोर रुग्णालयात दाखल केले होते. डॉक्टरांच्या मते रेखा पात्रा यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे वैद्यकीय-कायदेशीर अहवालानुसार, रेखा पात्रा यांच्या शरीरात ऑर्गनोफॉस्फोरस-आधारित कीटकनाशकाची विषबाधा झाली आहे.
आमदार रेखा पात्रा यांची प्रकृती चिंताजनक!
समोर आलेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालच्या भाजप आमदार रेखा पात्रा या काल त्यांच्या निवासस्थानी अचानक आजारी पडल्या. त्यांना तातडीने स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले, जिथे प्राथमिक उपचारानंतर त्यांना बसीरहाट सुपर स्पेशालिटी रुग्णालयात पाठवण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती खालावत असल्याने, डॉक्टरांनी त्यांना चांगल्या उपचारांसाठी कोलकाता येथील एका खासगी सुपर स्पेशालिटी रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेतला.
आयएएनएस या वृत्तसंस्थेने भाजप नेत्या अर्चना दास मजुमदार यांच्या हवाल्याने म्हटले आहे की, चार तासांनंतरही त्यांच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा न झाल्याने भाजप आमदारांना कोलकाता येथील आर.एन. टागोर रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेण्यात आला, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे वृत्त आहे.
प्रकृती गंभीर, आरोग्यमंत्र्यांनी दिली भेट!
अर्चना दास मजुमदार यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, रेखा पात्रा यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. आमदार रेखा पात्रा या डॉ. युधजित सेनगुप्ता यांच्या देखरेखीखाली असून त्यांना व्हेंटिलेशन सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. राज्याचे आरोग्य मंत्री शारदावत मुखर्जी यांनी सकाळी रुग्णालयाला भेट देऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
दरम्यान, पश्चिम बंगालमधील संदेशखाली येथे महिलांचा छळ, जमिनी बळकावणे आणि खंडणीचे आरोप असलेल्या टीएमसी नेते शेख शाहजहान यांच्या विरोधातील आंदोलनात रेखा पात्रा एक प्रमुख व्यक्तिमत्व होत्या. भाजपने नंतर त्यांचे स्वागत केले आणि त्यांना २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी तिकीट दिले. तथापि, त्यांना बसीरहाटची जागा जिंकता आली नाही. त्यानंतर त्यांनी या वर्षी एप्रिलमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत हिंगलगंज मतदारसंघ जिंकला आणि त्या भाजपच्या आमदार झाल्या.
