3 मिनिटांच्या नमाजमुळेच तुम्ही हैराण झालात, अजून किती द्वेष पसरवाल? शनिवारवाडा नमाज पठणाच्या वादात AIMIM नेत्याची उडी

Namaz at Shaniwarwada : शनिवारवाड्यात मुस्लीम महिलांनी नमाज पठण केल्याचा वाद अजून शमलेला नाही. भाजप आणि मुस्लीम राजकीय पक्षातील वाक् युद्ध सुरूच आहे. त्यात आता एमआयएमआयएमच्या राष्ट्रीय प्रवक्त्याने पुन्हा भाजपला डिवचले आहे.

3 मिनिटांच्या नमाजमुळेच तुम्ही हैराण झालात, अजून किती द्वेष पसरवाल? शनिवारवाडा नमाज पठणाच्या वादात AIMIM नेत्याची उडी
शनिवारवाड्यामध्ये नमाज पठन
| Updated on: Oct 21, 2025 | 9:36 AM

AIMIM Spokesperson Waris Pathan : शनिवारवाड्यात मुस्लीम महिलांनी नमाज पठण केले. त्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला. भाजपच्या राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी त्यांच्या एक्स या हँडलवर हा व्हिडिओ पोस्ट करत या कृतीवर तीव्र आक्षेप घेतला. त्यांनी याप्रकरणी कडक कारवाईची मागणी केली. प्रकरणात लागलीच मोर्चाचे आयोजन करण्यात आले. हे अत्यंत दुर्देवी आहे. शनिवार वाडा हा काही नमाज पठणाची जागा नाही. आम्ही या प्रकरणातील दोषींवर कारवाईची मागणी करत असल्याचे त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले होते. मुस्लीम महिलांनी नमाज पठण केल्याचा वाद अजून शमलेला नाही. भाजप आणि मुस्लीम राजकीय पक्षातील वाक् युद्ध सुरूच आहे. त्यात आता एमआयएमआयएमच्या राष्ट्रीय प्रवक्त्याने पुन्हा भाजपला डिवचले आहे.

3 मिनिटांच्या नमाजमुळे तुम्ही हैराण झालात

काही महिलांनी नमाज पठण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शनिवारवाड्याचे शुद्धीकरण केले. त्यावर एआयएमआयएमचे राष्ट्रीय प्रवक्ते वारिस पठाण यांनी भाजपला डिवचले. भाजप आपल्या देशाची धर्मनिरपेक्ष आणि बहुआयामी धोरण नष्ट करू पाहत आहे. भाजप केवळ द्वेष पसरवण्याचे काम करत आहे जर 3-4 मुस्लीम महिलांनी शुक्रवारी एकाच ठिकाणी नमाज पठण केले तर त्यामुळेच तुम्ही हैराण झालात का? असा सवाल त्यांनी केला. हिंदू ट्रेन आणि विमानतळावर गरबा खेळतात. तेव्हा तर मुसलमान त्यावर कधी आक्षेप घेत नाहीत, असे ते म्हणाले. ASI द्वारे संरक्षित या जागेत 3 मिनिटांच्या नमाज पठणाने तुम्ही हैराण झाल्याचे त्यांनी डिवचले. तुम्ही अजून किती द्वेष पसरवाल असा सवाल त्यांनी भाजप नेत्यांना केला. शनिवारवाडा नाही तुमची मनं स्वच्छ, शुद्ध करणे गरजेचे आहे, असा टोला वारिस पठाण यांनी लगावला.

हा लक्ष हटवण्याचा प्रयत्न

निलेश घायवळ प्रकरण आणि जैन बोर्डिंग जागाप्रकरणावरून लक्ष हटवण्यासाठी या प्रकरणाला हवा देण्यात येत असल्याचा आरोप काही संघटना करत आहे. नमाज पठनाचा व्हिडिओ समोर आला काय आणि लागलीच मोर्चा निघतो काय, शनिवार वाड्याचे शुद्धीकरण होते काय, हे सर्व प्री प्लान्ड असल्याचा आरोप काही संघटनांनी केला आहे. त्यामुळे भाजपविरोधात एमआयएम आणि इतर संघटना असा सामना रंगला आहे. तर प्रशासन या प्रकरणात पुढे काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पण तोपर्यंत दोन्ही बाजूंनी ऐन दिवाळीतच शाब्दिक फटाके फुटत आहेत.