Nilesh Ghaywal: देशातून फरार झाला, आता आला कोर्टातून मोठा निकाल; निलेश घायवळ बाबतची मोठी अपडेट काय?

Nilesh Ghaywal: २०२० साली निलेश घायवळ याने जीपसाठी खंडणी मागितली होती असा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता या प्रकरणी मोठी आणि महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

Nilesh Ghaywal: देशातून फरार झाला, आता आला कोर्टातून मोठा निकाल; निलेश घायवळ बाबतची मोठी अपडेट काय?
निलेश घायवळ
Image Credit source: tv9 Marathi
| Updated on: Sep 29, 2026 | 1:06 PM

पुण्यातील कुख्यात गुन्हेगार निलेश घायवळ सध्या फरार आहे. तो बनावट पासपोर्टच्या मदतीने लंडनमध्ये गेला असल्याचे समोर आले. आता देशातून फरार असलेला निलेश घायवाळ आणि त्याच्या साथीदारांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. २०२० साली निलेश घायवळ याने जीपसाठी खंडणी मागितली होती असा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र कोर्टाने या प्रकरणात निलेश घायवळ आणि त्याच्या साथीदाराची निर्दोष मुक्तता केली आहे.

कारागृहात असताना खंडणी मागितल्या प्रकरणी न्यायालयाने निलेश घायवळ सह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. आरोपी निलेश घायवळ याच्या वतीने ज्येष्ठ वकील विपुल दुशिंग,आरोपी मुसा शेख याच्या वतीने ॲड. रितेश गदादे, आरोपी अक्षय गोगावले याच्या वतीने ॲड. अनिश पाडेकर, आरोपी कुणाल कंधारे याच्या वतीने ॲड बिलाल मणियार,आरोपी संतोष धुमाळ आणि विपुल माझीरे याच्यासाठी ॲड सलमान पठाण यांनी कामकाज पाहिले.

Loading...

सध्या देशातून फरार असलेला निलेश घायवळ याला सबंधित प्रकरणात न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे. आरोपी देशात नसताना देखील केसचा निर्दोष निकाल लागणे ही दुर्मिळ घटना मानली जात आहे. निलेश घायवळ हा २०२०मध्ये दुसऱ्या एका गुन्ह्यात कारागृहात असताना संतोष धुमाळ याने फिर्यादीकडे भावाच्या रॅलीसाठी जीपच्या स्वरूपात खंडणीची मागणी करत होता. गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी हा गुन्हा उघडकीस आणला होता. परंतु लगेचच फिर्यादीने पोलिसांवर आणि तपास यंत्रणेवर गंभीर आरोप करत न्यायालयात आपली फिर्याद दबाव टाकून नोंदवली. तसेच उच्च न्यायालयात देखील याबाबत रीट याचिका दाखल करत आपले म्हणणे मांडले होते.

यावर उच्च न्यायालयाने कडक शब्दात ताशेरे ओढत पोलिसांना फिर्यादीचा पुन्हा एकदा जबाब नोंदवण्याचे आदेश दिले होते. या जबाबात देखील फिर्यादीने संपूर्ण घटनाक्रम नाकारला असून अशा प्रकारे गुन्हा घडला नसल्याचे नमूद केले होते. कालांतराने सदर खटला मकोका न्यायाधीश साळुंखे यांच्या न्यायालयात चालवला गेला. त्यावेळी देखील फिर्यादीने संपूर्ण फिर्याद नाकारत गुन्हे शाखा आणि तपास यंत्रणेने दबाव टाकून फिर्याद नोंदवल्याचा दावा केला. न्यायालयात शपथेवर गुन्हा नाकारत अशी घटना घडली नसल्याचे कोर्टात सांगितले.

इतर सर्व साक्षीदार आणि पंच यांनी देखील हा संपूर्ण घटनाक्रम नाकारला आहे. निलेश घायवळ या टोळीवर नुकतेच अनेक गुन्हे दाखल असून याबाबत उच्च न्यायालयात ॲड विपुल दुशिंग यांच्या वतीने निलेश घायवळ व इतर आरोपींनी रीट याचिका दाखल केल्या आहेत. यावेळी आरोपींचे वकील ॲड विपुल दुशिंग यांनी निकालाचे स्वागत केले. अशा प्रकारचे निकाल हे सुदृढ न्यायव्यवस्थेचे प्रतीक आहेत अशी भावना व्यक्त केली व न्याय व्यवस्थेचे आभार मानले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us