आला उन्हाळा, पंढरपूर विठ्ठलाच्या मूर्तींसाठी वापरली जाणार ही विशेष प्रक्रिया

| Updated on: Mar 25, 2023 | 10:35 AM

चैत्र महिना सुरु झाला की तापमान वाढू लागते. चंदन शितल असते. त्याचा लेप या काळात शरीर थंड ठेवतो आणि उष्णतेपासून बचाव करतो. यामुळे पंढरपूर येथील विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात उन्हाळ्यात नियमित चंदनाचा लेप लावून पूजा केली जाते.

आला उन्हाळा, पंढरपूर विठ्ठलाच्या मूर्तींसाठी वापरली जाणार ही विशेष प्रक्रिया
विठ्ठल-रुख्मिणी मंदिर
Image Credit source: टीव्ही९ नेटवर्क
Follow us on

पंढरपूर : उन्हाळा सुरु झाला की आपल्या अंगाची लाहीलाही होते. मग उन्हापासून आणि गर्मीपासून बचाव करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जातात. शरीराला थंडावा मिळण्यासाठी एसी अन् कुलरचा वापर होतो. सतत पंखा सुरु असतो. परंतु आपल्याप्रमाणे उन्हाचा त्रास श्री विठ्ठलाच्या मूर्तीला होतो. उष्णतेचा हा त्रास होऊ नये म्हणून सर्वांगाला चंदन लावण्याची परंपरा पंढरपुरात अनेक शतकांपासून आजही सुरु आहे. यावेळी अलंकारापेक्षाही सुंदर उठून दिसणारे विठ्ठलाचे रूप डोळ्यात साठ्वण्यासारखे आहे .श्री विठ्ठल रुक्मीणीला थंडावा मिळावा यासाठी खास चंदन उटी पूजा केली जाते.

का लावतात चंदनाचा लेप

हे सुद्धा वाचा

चैत्र महिना सुरु झाला की उष्णता वाढू लागते. चंदनाचा लेप या काळात शरीर थंड ठेवतो आणि उष्णतेपासून बचाव करतो. चंदनाला आयुर्वेदात ही महत्व आहे. चंदन हे अतिशय सुगंधी, शीतल असते. चंदनाच्या याच गुणामुळे दिवसभरातील हवेतील उष्णतेने शिणलेल्या विठू माउलीला शीतलता वाटावी यासाठी रोज दुपारी सुगंधी अशा चंदनाचा लेप सर्वांगाला लावला जातो. गुढी पाडवा ते मृग नक्षत्रापर्यंत रोज दुपारी चंदन उटी पूजा केली जाते. पूजेनंतर देवाला नैवेद्य म्हणून कैरीच पन्हा आणि थंड लिंबू सरबत ही दाखवले जाते, अशी माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी दिली.

चंदन उच्च प्रतीचा


श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने चंदन उटी पूजेसाठी उच्च प्रतीचा चंदनाचा वापर केला जातो. हा चंदन कर्नाटकामधील बंगलुरू, म्हैसूरमधून खरेदी केला जातो . श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेसाठी साठी रोज दीड किलो चंदन लागते. चंदन उगाळण्यासाठी मंदिर समितीने अद्यावत अशी चंदन उगाळण्याची मशीन आणली आहेत.

ही संधी मिळते

विठ्ठलाची महापूजा बंद असल्याने विठुरायाचे रूप डोळे भरून पाहण्याची संधी या उटी पूजेमुळे मिळते. सुवर्णालंकारा पेक्षाही देखणे रूप चंदन उटी पूजेमध्ये दिसते, अशी पूजा करणाऱ्याला जगण्याची उर्जा मिळते अशीही भावना भाविकांनी व्यक्त केली . म्हणून अनेक भाविक चंदन उटी पूजा करून समाधान मानतात.

भाविक मागणी नोंदवू शकतात


श्री विठ्ठल रुक्मिणीची मृग नक्षत्र निघेपर्यंत चंदन उटी पूजा केली जाते. यासाठी अजूनही भाविक आपली मागणी नोंदवू शकतात आणि पूजेचा आनंद घेऊ शकतात. यासाठी त्यांनी मंदिर समितीच्या अधिकृत वेबसाईटवर भेट देऊन आपली पूजा नोंदवावी, असे आवाहन मंदिर समितीने केले आहे.