पुणे विषारी दारू प्रकरणात मोठा ट्विस्ट, दोन बड्या पोलिसांच्या विकेट, मुख्य आरोपीचे कॉल रेकॉर्ड समोर

पुणे अवैध विषारी दारू प्रकरणात मुख्य आरोपी राधेश्याम प्रजापतीच्या संपर्कात असल्याच्या आरोपावरून उरुळी कांचन पोलीस ठाण्यातील दोन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत २४ जणांचा मृत्यू झाला असून एसआयटीकडून तपास सुरू आहे.

पुणे विषारी दारू प्रकरणात मोठा ट्विस्ट, दोन बड्या पोलिसांच्या विकेट, मुख्य आरोपीचे कॉल रेकॉर्ड समोर
pune liquor case
| Updated on: Jun 01, 2026 | 12:48 PM

पुण्यातील पिंपरी-चिंचवड आणि परिसरात खळबळ उडवून देणाऱ्या विषारी दारू प्रकरणी आता नवनवीन अपडेट समोर येत आहे. या विषारी दारुमुळे आतापर्यंत २४ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे दारु बंदी करा अशी मागणी सातत्याने होत आहे. त्यातच आता विषारी दारु प्रकरणी पोलीस प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. या गुन्ह्यात दोन पोलीस अधिकारीही सहभागी असल्याचे समोर आले आहे. मुख्य आरोपीच्या थेट संपर्कात असल्याचा ठपका ठेवत उरुळी कांचन पोलीस ठाण्यातील दोन पोलीस अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. या कारवाईमुळे अवैध दारू व्यवसायाला संरक्षण देणाऱ्या पोलीस आणि गुन्हेगारांच्या साठ्यालोट्याचे नेटवर्क पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे.

मुख्य आरोपीशी होते कनेक्शन 

उरुळी कांचन पोलीस ठाण्यात तैनात असलेले पोलीस अधिकारी अजित शिवाजी काळे आणि सुमित नंदकुमार वाघ अशी निलंबन करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, विषारी दारू दुर्घटनेनंतर या प्रकरणाची विभागीय चौकशी सुरू करण्यात आली होती. या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि मुख्य आरोपी राधेश्याम प्रजापती याच्याशी हे दोन्ही अधिकारी सतत संपर्कात होते, असे तपासात निष्पन्न झाले. या प्राथमिक तपास अहवालाच्या आधारे पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांनी या दोन्ही अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे.

मृतांची संख्या २४ वर

या जीवघेण्या विषारी दारूमुळे आतापर्यंत २४ निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर अनेक बाधितांवर अजूनही विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असून, काहींची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तपासाची चक्रे जलद गतीने फिरवली आहेत. मुख्य आरोपी राधेश्याम प्रजापती याला उरुळी कांचन परिसरातून आधीच बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. त्याच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी भिवंडी परिसरातून तब्बल ५,९२९ लीटर मिथेनॉल जप्त केले आहे. या विषारी दारूच्या निर्मितीसाठी याच मिथेनॉलचा वापर करण्यात आला होता. या प्रकरणात आतापर्यंत एकूण २२ संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे.

SIT कडून कसून चौकशी; २१ पोलीस आधीच निलंबित

या संपूर्ण प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांनी विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना केली आहे. एसआयटी कडून या प्रकरणातील प्रत्येक धागेदोरे शोधून काढले जात आहेत. केवळ गुन्हेगारच नाही, तर त्यांना पाठीशी घालणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवरही कठोर कारवाईचे सत्र सुरू आहे. कर्तव्यपालनात निष्काळजीपणा दाखवल्याप्रकरणी या दोन अधिकाऱ्यांशिवाय इतर २१ पोलीस अधिकाऱ्यांना यापूर्वीच निलंबित करण्यात आले आहे. या गुन्ह्यातील कोणत्याही दोषीला पाठीशी घातले जाणार नाही. तपास पूर्णपणे निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने सुरू असून, अवैध व्यवसायांचे संपूर्ण नेटवर्क उद्ध्वस्त केले जाईल, असा इशारा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us