
मावळ, पुणे | 03 ऑक्टोबर 2023, रणजित जाधव : लेखक राजन खान यांचा मुलगा डेबू याने आपलं आयुष्य संपवलं आहे. वयाच्या अवघ्या 28 व्या वर्षी डेबूने आत्महत्या केली आहे. या घटनेवर सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे. पुण्यातील मावळमधील सोमटने फाटा इथे ही घटना घडली आहे. काल (सोमवार) संध्याकाळी ही घटना समोर आली आहे. डेबू हा आयटी इंजिनिअर होता. वयाच्या अवघ्या 28 व्या वर्षी डेबूने गळफास घेत आयुष्य संपवलं. इतक्या कमी वयात डेबूने हा टोकाचा निर्णय घेतल्याने आप्तेष्टांना मोठा धक्का बसला आहे. डेबूने मृत्यूपूर्वी लिहिलेल्या पत्रात आपल्या मृत्यूचं कारण नमूद केलं आहे.
राजन खान यांचा मुलगा डेबू हा आयटी इंजिनिअर होता. तो मावळमधील सोमटने फाटा इथं एकटाच राहायचा. सोमवारी सकाळपासून त्याने घराचं दार उघडलंच नाही. त्यामुळे शेजाऱ्यांना संशय आला. मग दुपारी घर मालकिणीने डेबूच्या पुण्यात राहणाऱ्या भावाला फोन केला. डेबूच्या भावाने त्यानंतर लगेच डेबूशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. फोन केल्यानंतर डेबूने तो फोन घेतला नाही. त्यामुळे भावाने डेबू राहत असललेल्या सोमटने फाटा इथल्या घरी गेला. घराचं दार ठोठावलं. पण डेबूने काहीच प्रतिसाद दिला नाही.
डेबूच्या भावाने तळेगाव पोलिसांशी संपर्क साधला. थोड्या वेळात पोलीस घरी आले. त्यांनी दार तोडलं. घरात प्रवेश करताच धक्कादायक बाब समोर आली. बेडरूममधील पंख्याला डेबूने गळफास घेतल्याचं समोर आलं.
प्रसिद्ध लेखक राजन खान यांच्या मुलाने आत्महत्या केली आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. -आत्महत्येपूर्वी डेबूने लिहून ठेवलेली चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागली आहे. या चिठ्ठीत आत्महत्या करण्याचं कारण समोर आलं आहे. आर्थिक विवंचनेतून आपण आत्महत्या करत असल्याचं या चिठ्ठीत म्हणण्यात आलं आहे. आर्थिक व्यवहाराची देवाण-घेवाण केली. त्यातून मोठा आर्थिक फटका बसल्याचा उल्लेख आहे. ज्या लोकांसोबत आर्थिक व्यवहार केले त्यांची नावंही या चिठ्ठीत लिहिण्यात आली आहेत.
डेबूच्या अकाली जाण्याने त्यांच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. त्याचे मित्र आणि जवळच्या माणसांसाठीही ही हा मोठा धक्का आहे. सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे. डेबूच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं आहे. शवविच्छेदनानंतर त्याचा मृतदेह लेखक राजन खान आणि कुटुंबियांकडे सोपवण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणी आता पुढील तपास करत आहेत.