
पुणे | 12 सप्टेंबर 2023 : पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडच्या (Pmpml ) बसमधून नवीन सुविधा मिळणार आहे. बसेसमध्ये आता गुगल पे आणि फोन पेची सुविधा देण्यात येणार आहे. युपीआय कोड स्कॅन करत प्रवाशांना तिकीट काढता येणार आहे. पुढील आठवड्यापासून पीएमपीएमएलच्या सर्व बसमध्ये क्यूरआर कोड उपलब्ध होणार आहे. यामुळे प्रवासी ऑनलाइन पेमेंट करत प्रवास करुन शकतात. पीएमपीएमएलच्या या निर्णयामुळे सुट्ट्या पैशांचा घोळ मिटणार आहे. तसेच प्रवाशांना खिशात पैसे न बाळगता प्रवास करता येणार आहे.
आम आदमी पक्ष महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवणार आहे. पुणे महापालिकेसह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्याचा निर्णय आपकडून घेण्यात आला. आपचे खासदार संजय सिंह यांची पुणे शहरात हा निर्णय जाहीर केला. पुण्यात लवकरच आपची महासंकल्प जनसभा घेण्यात येणार आहे. पुणे महानगरपालिका लढवण्यासाठी आम आदमी पक्षाकडून तयारी सुरू करण्यात आल्याचे संजय सिंह यांनी सांगितले.
पुणे येथील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थी संख्या दुप्पट झाली आहे. परंतु कर्मचाऱ्यांची आणि अधिकऱ्यांची संख्या मात्र कमीच आहे. विद्यापीठात प्राध्यापकाबरोबर कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याची माहिती समोर आली आहे. पुणे विद्यापीठात 543 शिक्षकांची पदे रिक्त आहेत. पुणे विद्यापीठाने महाविद्यालयांना शिक्षकांची पदे भरण्यासंदर्भात पत्रही दिले आहेत.
मनसे नेते अमित ठाकरे लोकसभा निवडणुकीच्या कामाला लागले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी अमित ठाकरे यांनी मंगळवारी पुण्यात मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवली आहे. बैठकीत पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. पुण्यातील मनसेच्या शहर कार्यालयात अमित ठाकरे शहराचा आढावा घेण्यात येणार आहे. राज ठाकरे यांच्या पाठोपाठ आता अमित ठाकरे यांनी पुणे जिल्ह्यावर लक्ष केंद्रीत केले आहे.
पुण्यातील बालगंधर्व चौकात धनगर समाजाकडून मंगळवारी आंदोलन करण्यात आले. धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. ढोल वाजवत धनगर समाजाकडून आंदोलन करण्यात आले. दोन दिवसांपूर्वी महसूल मंत्री राधाकृष्ण पाटील यांच्यावर धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी भंडारा उधळला होता.