पुण्यातील बस प्रवास महागणार, दहा वर्षांनंतर पीएमपीएमएलच्या बसभाड्यात मोठी वाढ, जाणून घ्या नवीन दर
पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडने पुणे, पिंपरी-चिंचवड व पीएमआरडीए कार्यक्षेत्रात बस भाड्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन भा़डेवाढ एक जूनपासून लागू होणार आहे. दैनंदिन पासचे दरही वाढवण्यात आले आहे.

पुणेकरांना शहर वाहतूक सेवेच्या बसमधून प्रवास करताना आता जादा पैसे मोजावे लागणार आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (PMPML) बससेवेचा दरात येत्या १ जून पासून वाढ होत आहे. पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये सुधारित स्टेज रचनेनुसार नव्या दरांची अंमलबजावणी होणार आहे. दहा वर्षानंतर पीएमपीएमएलच्या भाड्यात वाढ करण्यात आली आहे.
पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडमार्फत पुणे, पिंपरी-चिंचवड व पीएमआरडीए कार्यक्षेत्रात बससेवा पुरवण्यात येते. या सेवेच्या प्रवास भाड्यात १ जून २०२५ पासून सुधारित स्टेज रचनेनुसार बदल करण्यात येत आहे. नव्या दरांची अंमलबजावणी पहाटेपासूनच सुरू होणार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या ३१ मार्च २०१८ रोजीच्या राजपत्रानुसार, तसेच इतर परिवहन संस्थांच्या दरवाढीच्या धर्तीवर पीएमपीएमएलने प्रवासात सुसूत्रता येण्यासाठी स्टेज रचनेत बदल केला आहे. ५ ते १० किमी अंतरावर आधारित ११ स्टेज निश्चित केल्या आहेत. या रचनेनुसार १ किमी ते ८० किमीपर्यंत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सुधारित तिकीट दर लागू होणार आहेत. यास पीएमपीएमएलच्या संचालक मंडळ आणि प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, पुणे यांनी मान्यता दिली आहे.
असे असणार नवीन दर
- प्रवासाचे एकूण ११ टप्पे
- एक ते ३० किलोमीटर अंतरासाठी दर पाच किलोमीटर अंतराने सहा टप्पे
- ३० ते ८० किलोमीटरसाठी दहा किलोमीटर अंतराने पाच टप्पे
- ५ किमीपर्यंतसाठी १० रुपये
- ५.१ ते १० किमी २० रुपये
- १०.१ ते १५ किमी ३० रुपये
- १५.१ ते २० किमी ४० रुपये
पासचे दरही वाढवले
बस प्रवासासोबत दैनंदिन आणि मासिक पासचे दरही वाढवण्यात आले आहे. पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये दैनंदिन पाससाठी पूर्वी ४० रुपये लागत होते. आता त्याला ७० रुपये लागणार आहे. पीएमआरडीए हद्दीत पाससाठी आता १२० रुपयांऐवजी १५० रुपये लागणार आहेत. तसेच मासिक पास ९०० रुपयांऐवजी १५०० रुपये लागतील. विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग प्रवाशांना देण्यात येणाऱ्या सवलतीत बदल केला नाही.
