Pune Drug Case : पुणे पोलीस आयुक्त ॲक्शन मोडमध्ये, ‘आमची काय दादागिरी असते ते दाखवून देवू’
Pune Drug Case : पुण्यातील एफसी रोडवरील L3 बारमधील व्हायरल झालेल्या व्हिडीओनंतर खळबळ उडाली होती. या प्रकरणानंतर पुण्यातही ड्रग्जचं जाळ पसरल्याचं बोललं जात आहे. मात्र आता या प्रकरणानंतर पुणे पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले आहेत, पुण्याचे आयुक्त अमितेश कुमार यांनी दमच भरला आहे.

पुण्यातील L3 बार पार्टीमध्ये ड्रग्ज घेतानाचा व्हिडीओ समोर आल्यामुळे खळबळ उडाली होती. पुण्यातील नामांकीत आणी कायम तरूणाईने गजबजलेल्या एफसीर रोडवरील बारमध्ये हा प्रकार समोर आला होता. या प्रकरणाची मुख्यमंत्र्यांनीही गंभीर दखल घेत बारवर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानंतर पुण्यातील अनधिकृत पब आणि बारवर आता तोडक कारवाई होत असलेली पाहायला मिळत आहे. L3 बार पार्टीमध्ये ड्रग्ज घेणाऱ्या तरूणांसह मॅनेजर आणि काही वेटर यांना अटक केली गेली आहे. या प्रकरणामुळे पुण्यातील व्यवस्थेवर जोरदार टीका करण्यात आली. आता पुण्याचे पोलीस आयुक्त अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. एक पाऊल पुढे जाऊन आमची काय दादागिरी असते ते दाखवून देवू असं म्हणत पुणे पोलीस आयुक्तांनी सज्जड दम दिला आहे.
कोणत्याही परिसरात दारू, अमली पदार्थ विकले आणि पोलिसांच्या विरुद्ध भांडले तर आम्ही पण भांडणार. एक पाऊल पुढे जाऊन आमची काय दादागिरी असते ते दाखवून देवू. पुण्यात काही विपरीत करण्याचा प्रयत्न केला तर कारवाई होणार, कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार नाही जातीय सलोखा टिकला पाहिजे. पोलिसांचा संयम आहे तो पर्यत संयम संयम सुटला की कारवाई कडक करणार असल्याचं म्हणत पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सज्जड दमच दिला आहे. अंमली पदार्थ विरोधी दिनाच्या निमित्ताने आपणही आपल्या मुला मुलींवर लक्ष ठेवा, असं आवाहन अमितेश कुमार यांनी नागरिकांना केलं आहे.
दरम्यान, पुणे L3 बार पार्टी प्रकरणात आता एन डी पी एस कलम अन्वये गुन्हा दाखल करण्याता आला आहे. अंमली पदार्थांचे सेवन आणि विक्री प्रकरणी आता आरोपींच्या अडचणी वाढणार आहेत. अमली औषधीद्रव्ये आणि मन:प्रभावी पदार्थ अधिनियम 1985 अन्वये आरोपींवर गुन्हा दाखल केला गेलाय.
