Pune Yerwada Jail | पुणे येथील कैद्याची कमाल, कारागृहात राहून केला 26 लाखांचा अपहार
Pune Yerwada Jail | पुणे येथील एका जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या कैद्याने कमाल केली. चक्क कारागृहात त्याने अपहार केला. हा अपहार तब्बल 26 लाखांचा आहे. कैद्याचा हा प्रताप आता उघड झाला आहे. 2006 पासून हा कैदी येरवडा कारागृहात आहे.
पुणे | 23 सप्टेंबर 2023 : कारागृहात असणारे कैदी विविध गुन्ह्यांमध्ये शिक्षा भोगत असतात. त्यांच्या प्रत्येक हालचालीवर कारागृहातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे लक्ष असते. परंतु एखादा कैदी कारागृहात राहून अपहार करु शकतो का? हा अपहार तब्बल 26 लाखांचा? या प्रश्नांचे उत्तरे नकारार्थी असतील. परंतु पुणे येथील येरवडा कारागृहातील कैद्याने हा अपहार करुन दाखवला आहे. जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना त्याने हा अपहार केला आहे. त्याच्या या प्रकारामुळे अनेक जण अचबिंत झाले आहे.
कोण आहे हा कैदी
पुणे येथील येरवडा मध्यवर्ती कारागृहातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 2006 पासून जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या कैद्याने 26 लाखांचा अपहार केला आहे. सचिन रघुनाथ फुलसुंदर असे या कैद्याचे नाव आहे. त्याला सत्र न्यायालयाने 21 मे 2009 रोजी जन्मठेपेची शिक्षा दिली होती. नारायणगाव येथील एका खुनाचा आणि बलात्कारच्या प्रयत्नात त्याला ही शिक्षा झाली. त्याला बलात्काराच्या गुन्ह्यात जन्मठेप झाली आहे.
काय आहे प्रकार
जुन्नर येथील असणारा फुलसुंदर याला कारागृहात सफाई कामगाराचे काम दिले होते. तो कारागृहातील फॅक्टरी विभागातील तयार केलेल्या वस्तू बाहेर पाठवण्याच्या निमित्ताने जात होता. या ठिकाणी कैद्यांच्या नातेवाईकांनी पाठवलेल्या मनी ऑर्डरच्या नोंद असतात. या रेकॉर्डचा वापर कैदी कारागृहाच्या कॅन्टीनमधून खरेदी करण्यासाठी करतात. त्याचा फायदा फुलसुंदर याने घेतला आणि अपहार सुरु केला.
कसा केला अपहार
फुलसुंदर याने मनी ऑर्डरचा रेकॉर्ड असलेल्या ठिकाणी खोट्या तारखा आणि बनावट सह्या केल्या. तसेच बोगस खाती करुन त्याने या रजिस्टरमध्ये फेरफार केली. त्याने इतर कैद्यांच्या नावे मनीऑर्डर मिळाल्याचा दावा करत स्वतःच्या नावावर पैसा जमा केला. यामाध्यमातून त्याने 26 लाख 69 हजार 911 रुपयांचा अपहार केला. ही रक्कम त्यांने कँटिनमध्ये खरेदी करण्यासाठी वापरली. तब्बल 2021 आणि ऑगस्ट 2023 पर्यंत तो हे काम करत असताना कारागृह प्रशासनाला ते समजले नाही. आता या प्रकरणात तो एकटा आहे की त्याच्यासोबत इतर कोणी आहे? याचाही शोध घेतला जाणार आहे.