पत्रकारांनी नारायण राणेंचं नाव काढलं आणि राज ठाकरे म्हणाले, ऐ चल बस्स…

| Updated on: Aug 20, 2021 | 5:09 PM

केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांची मुंबईत जन आशीर्वाद यात्रा सुरू आहे. त्याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना प्रश्न विचारण्यात आला. (raj thackeray)

पत्रकारांनी नारायण राणेंचं नाव काढलं आणि राज ठाकरे म्हणाले, ऐ चल बस्स...
Follow us on

पुणे: केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांची मुंबईत जन आशीर्वाद यात्रा सुरू आहे. त्याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा, ए चल बस्स… असं म्हणत राज ठाकरे यांनी राणेंच्या यात्रेवर बोलण्यास नकार दिला. त्यामुळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. (raj thackeray’s no reaction on narayan ranes jan ashirwad rally)

राज ठाकरे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली. पत्रकार परिषद संपत आली असताना एका पत्रकाराने त्यांना नारायण राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेबाबत सवाल केला. तेव्हा, ऐ चल बस्स… असं म्हणत राज यांनी या प्रश्नाला उत्तर देणं टाळलं.

ज्यांचं आकलन नाही त्यांच्यावर किती बोलायचं

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंनी चुकीचा इतिहास लिहिला म्हणता, पण सिद्ध करा ना… 50 साली पहिलं पुस्तक आलं. त्यावेळी तुम्हाला चुकीचा इतिहास कळला नाही का? ज्याचं काही आकलन नाही, त्याच्यावर काय बोलायचं? कोण जेम्स लेन? कुठे आहे सध्या? आग लावायला आला, त्याच वेळी का आला? हे सर्व वेल डिझाईन्ड आहे, अशी टीका त्यांनी केली.

जात पाहून भेटत नाही

मी बाबासाहेब पुरंदरेंना भेटतो. ते शिवशाहीर म्हणून भेटतो. ब्राह्मण म्हणून भेटत नाही. शरद पवारांना भेटतो तेव्हा मराठा म्हणून भेटत नाही. तुम्हाला भेटतो तेव्हा तुमची जात पाहून भेटत नाही. आपण यातून बाहेर पडलं पाहिजे, असं सांगतानाच मी काय वाचतो आणि काय वाचलं पाहिजे हे मी आणि माझ्या पक्षाला माहीत आहे. मला कुणी मोजण्याचं काम करू नका, असं त्यांनी सांगितलं.

मोदींनी विकासाच्या मुद्द्यावरच निवडणुका लढवल्या

नरेंद्र मोदी हे विकासाच्या मुद्द्यावर पंतप्रधान झाले. जात-धर्माच्या आधारे नाही. लोक विकासाच्या मुद्द्यावरही मतदान करतात हे दिसलं. पण मी मुलाखतीत एका मुद्द्याच्या अनुषंगाने बोललो. आता काय चाललंय तर जातीचं वातावरण तयार करण्यात येतंय. मी शरद पवारांची मुलाखत घेतली होती. त्यावर पत्रकार म्हणाले, राज ठाकरेंनी भूमिका बदलली. पण त्याचा काय संबंध? मी त्यांच्या वाढदिवसाला भाषण केलं होतं. त्याची सुरुवात होती. आजचा दिवस पाहता काही गोष्टी या राखूनच ठेवल्या पाहिजेत. वाढदिवशी आपण चांगलं बोलतो. मग म्हणजे काय भूमिका बदलली का?, असा सवाल त्यांनी केला.

प्रबोधनकारांचे संदर्भ त्या काळातले

राष्ट्रवादीच्या जन्मानंतर दुसऱ्या जातीबद्दलचा द्वेष वाढला. यापूर्वी जातीजातीत मतदान व्हायचं. पण राष्ट्रवादीच्या जन्माननंतर दुसऱ्या जातीबद्दल द्वेष वाढला. हे सर्वांना माहिती होतं. बोललो फक्त मी. यावर मला सांगितलं जातं प्रबोधनकारांचं पुस्तक वाचा. मी सर्वांची पुस्तकं वाचलीत. प्रबोधनकरांचे संदर्भ त्या त्या काळातले होते. माझ्या आजोबांचं लिखाण आपल्याला हवं तसं घ्यायचं असं चालणार नाही. मी यशवंतरावांचंही वाचलं आहे, त्यांचेही मत काय होतं हेही मला माहिती आहे, असंही ते म्हणाले. (raj thackeray’s no reaction on narayan ranes jan ashirwad rally)

 

संबंधित बातम्या:

‘त्याचा’ संबंध काय हे शरद पवारांनी मला एकदा समजावून सांगावं: राज ठाकरे

‘मी प्रबोधनकार वाचले तसे यशवंतराव चव्हाणही वाचले आहेत’, राज ठाकरेंचं राष्ट्रवादीच्या नेत्यांना जोरदार प्रत्युत्तर

त्याच दिवशी खासदारकी सोडणार होतो; खासदार संभाजी छत्रपतींचा मोठा गौप्यस्फोट

(raj thackeray’s no reaction on narayan ranes jan ashirwad rally)