Mohan Bhagwat : लहान मुलांच्या प्रायव्हेट पार्ट्सबाबत विचारणं ही डाव्यांची… मोहन भागवत नेमकं काय म्हणाले?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी डाव्यांवर सडकून टीका केली आहे. अभिजीत जोग लिखित "जगाला पोखरणारी डावी वाळवी" या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी मोहन भागवत यांच्या हस्ते पुस्तकांचं प्रकाशन करण्यात आलं.

पुणे | 18 सप्टेंबर 2023 : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी डाव्यांवर जोरदार हल्ला चढवला आहे. यावेळी त्यांनी डाव्यांना भारतीय संस्कृतीचा दाखलाही दिला आहे. तसेच अमेरिकेतील तत्कालीन ट्रम्प सरकारचं एक उदाहरणही दिलं आहे. छोट्या मुलांच्या प्रायव्हेट पार्टबाबत विचारणं हा डाव्या विचारांचा परिणाम आहे, असा हल्लाच मोहन भागवत यांनी चढवला आहे. भागवत यांच्या या विधानावर डाव्यांकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे. पुण्यात एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात मोहन भागवत बोलत होते.
मी गुजरातच्या एका शाळेत गेलो होतो. तिथल्या एका शिक्षकाने मला किंडरगार्टन शाळेत लावलेला एक नियम दाखवला. केजी-2 चे मुलांना त्यांच्या प्रायव्हेट पार्टची माहिती आहे काय? याची माहिती काढण्यास शिक्षकांना सांगणारा हा नियम होता. पाहा डाव्यांचा विचार कुठेपर्यंत गेला आहे. डाव्यांच्या मदतीशिवाय अशी विचारणा करणं शक्यच नाही. अशा प्रकारचे हल्ले आपल्या संस्कृतीशी संबंधित सर्व गोष्टींवर होत आहे, असा दावा मोहन भागवत यांनी केला.
संस्कृतीवर आक्रमण
आपल्या संस्कृतीवरील सर्व चांगल्या गोष्टींवर अशा प्रकारचे हल्ले होत आहेत, असं ते म्हणाले. अमेरिकेत ट्रम्प सरकारनंतर नवं सरकार आलं. त्यावेळी त्या सरकारचा पहिला आदेश शाळेशी संबंधित होता. विद्यार्थ्यांशी जेंडरच्या बाबत चर्चा करू नये असं त्या आदेशात म्हटलं होतं. विद्यार्थी याबाबतचा निर्णय घेण्यास सक्षम असलं पाहिजे. जर एखाद्या मुलाला तो मुलगी आहे असं वाटत असेल तर त्याला मुलींसाठीच्या टॉयलेटमध्ये जाण्याची परवानगी दिली पाहिजे, असं त्यांनी सांगितलं.
डाव्यांना अहंकर
डाव्यांना अहंकार आणि आपल्या दृष्ट प्रवृत्तीचा प्रचंड अभिमान असतो. त्यांना लोकांचं समर्थन नाहीये. त्यांच्याकडे पैसे कमी असतील. पण त्यांचा विचार वाढत आहे. पसरत आहे. नेमकं आपण तिथे कमी पडतोय. आपल्याबाबत जो भ्रम तयार केला गेला आहे, तो दूर केला पाहिजे, असं आवाहनही त्यांनी केलं. अभिजीत जोग लिखित “जगाला पोखरणारी डावी वाळवी” या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी मोहन भागवत यांच्या हस्ते पुस्तकांचं प्रकाशन करण्यात आलं. पुण्यातील सिम्बॉयसिस महाविद्यालयात हा सोहळा पार पडला.