राज ठाकरे यांच्या नेतृत्वाला शिंदे गटातून जोरदार विरोध; शहाजी बापू पाटील यांनी खास शैलीत ठणकावले

ऐन लोकसभा निवडणुकीत राज्यात मोठी समीकरणे घडण्याची शक्यता आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यानंतर राज ठाकरे यांच्याकडे शिवसेनेची धुरा जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. राज ठाकरे यांच्या हातीच मूळ शिवसेना देण्यात येणार आहे. मात्र, शिंदे गटातील नेत्यांना ही गोष्ट मान्य नसल्याचं समोर आलं आहे.

राज ठाकरे यांच्या नेतृत्वाला शिंदे गटातून जोरदार विरोध; शहाजी बापू पाटील यांनी खास शैलीत ठणकावले
shahaji bapu patil
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Mar 25, 2024 | 1:26 PM

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे शिवसेनेची धुरा देण्यात येणार असल्याचं सांगण्यात येतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपूर्ण शिवसेनेची धुरा राज ठाकरे यांच्याकडे द्यायची आणि या शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनाही महत्त्वाचं पद द्यायचं अशा हालचाली सुरू झाल्या आहेत. भाजप नेते अमित शाह यांची राज ठाकरे यांनी भेट घेतल्यानंतर या चर्चांना अधिकच उधाण आलं आहे. या चर्चांमधील तथ्यांबाबत मनसे किंवा भाजपकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, शिंदे गटाने राज ठाकरे यांच्या नेतृत्वाला कडाडून विरोध केला आहे. शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी राज ठाकरे यांच्या नेतृत्वाला विरोध केला आहे.

काय डोंगर, काय झाडी फेम शहाजी बापू पाटील यांनी मीडियाशी संवाद साधताना हा विरोध केला आहे. आमच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदेच राहिले पाहिजेत. त्यात आम्ही कोणतीही तडजोड करणार नाही. असं काही असेल तर साहेबांना भेटून आम्ही स्पष्ट नकार देऊ, असे म्हणत शहाजी बापू पाटील यांनी राज ठाकरेंच्या नेतृत्वाला जोरदार विरोध केला आहे.

त्यांचाही विरोध मावळेल

यावेळी त्यांनी मोहिते पाटलांबाबतही भाष्य केलं. मोहिते पाटलांनी माढ्यात रणजीत नाईक निंबाळकर यांना विरोध करणं किंवा स्वतःला तिकीट मागणं यात काही गैर नाही. अनेक वर्षापासून ते जिल्ह्यात राजकारण करत आहेत. परंतु शेवटच्याक्षणी देवेंद्र फडणवीस त्यांच्याशी चर्चा करतील. रामराजे निंबाळकरांचा जसा विरोध मावळला, तसाच मोहिते पाटलांचाही विरोध लवकरच मावळेल, असा आशावाद शहाजी बापू यांनी व्यक्त केला.

तर निवडणूक अशोभनीय

माढ्यातून महाविकास आघाडीने शेकापचे अनिकेत देशमुख यांना उमेदवारी दिली तर ही लढत अशोभनीय असेल. त्यामुळे भाजपचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर हे तीन लाख मताधिक्याने निवडून येतील, असा दावाही त्यांनी केला. माढा लोकसभेचे महायुतीचे उमेदवार रणजीत सिंह नाईक निंबाळकर हे उद्या आणि परवा दोन दिवस सांगोला विधानसभा मतदारसंघाचा गाव भेट दौरा करणार आहेत. जनतेशी संवाद साधणार आहेत. राज्यात महायुतीच्या 45 पेक्षा ज्यादा जागा निवडून येतील, असंही ते म्हणाले.