Pune crime : भटक्या कुत्र्यांना लाकडी दांडक्यानं बेदम मारहाण, लोणावळ्यातल्या चौघांविरोधात गुन्हा दाखल

| Updated on: Sep 13, 2022 | 5:05 PM

7 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5च्या सुमारास स्वारंग सोसायटी येथील बंगला नं. 12च्या गेटजवळ या चोघांनी संगनमत करून काही कारण नसताना भटक्या कुत्र्यांना लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली.

Pune crime : भटक्या कुत्र्यांना लाकडी दांडक्यानं बेदम मारहाण, लोणावळ्यातल्या चौघांविरोधात गुन्हा दाखल
भटकी कुत्री, संग्रहित छायाचित्र
Image Credit source: tv9
Follow us on

लोणावळा, पुणे : लोणावळ्यात भटक्या कुत्र्यांना मारहाण (Beating stray dogs) करणे चार जणांना महागात पडले आहे. लोणावळा पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. प्राण्यांना क्रूरतेने वागणूक देणे या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रियंका बालापोरीया यांनी याबाबत लोणावळा शहर पोलिसांत (Lonavala police) तक्रार दिली आहे. या प्रकरणी नितीन आहिरे, राजेश आचार्य, संजय आचार्य, मोहन यादव (सर्व रा. स्वारंग सोसायटी गोल्डव्हॅली सेक्टर डी, न्यू तुंगार्ली लोणावळा, ता. मावळ) या चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रियंका व्हिस्पी बालापोरीया (वय 31, रा. बंगलो नं 1516, स्वारंग सोसायटी गोल्डव्हॅली सेक्टर डी न्यू तुंगार्ली, लोणावळा, मावळ, मूळ रा. बी 8 कॅप्टन कॉलनी हाजी अली, मुंबई) यांनी फिर्याद दिली आहे. यावरून हा गुन्हा दाखल (Filed a case) करण्यात आला आहे.

तीन कुत्री झाली विकलांग

लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 7 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5च्या सुमारास स्वारंग सोसायटी येथील बंगला नं. 12च्या गेटजवळ या चौघांनी संगनमत करून काही कारण नसताना भटक्या कुत्र्यांना लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. यात तीन कुत्री विकलांग झाली. यापैकी एका काळ्या रंगाच्या कुत्र्याला तोंडावर, पायांवर लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. यात कुत्र्याचा जीव गेला. त्यानंतर या कुत्र्याचा मृतदेह अज्ञातस्थळी टाकून विल्हेवाट लावली.

मुक्या प्राण्यांना क्रूर वागणूक

मुक्या प्राण्यांना अशा पद्धतीने क्रुरतेने वागणूक देणाऱ्यांविरोधात प्रियंका बालापोरीया यांनी आक्रमकता दाखवली आणि तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून लोणावळा शहर पोलीस निरीक्षक सिताराम डुबल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अबनावे यांनी गुन्हा दाखल केला आहे. तर हवालदार लक्ष्मण उंडे अधिक तपास करीत आहेत.

कठोर कारवाईची मागणी

शहरात अनेक ठिकाणी भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली आहे. अशावेळी काही नागरिकांकडून अशा कुत्र्यांना मारहाण केली जाते. पार्किंग परिसरात भिंत बांधून त्यात कुत्र्यांना बंदिस्त केल्याचा अमानवी प्रकारही काही महिन्यांपूर्वी घडला होता. आता विकलांग होईपर्यंत कुत्र्यांना मारण्यात आले आहे. त्यामुळे अशाप्रकारची कृत्ये करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.