राष्ट्रवादीत मोठी घडामोड, सुनील तटकरे थेट पुण्यात, सुनेत्रा पवारांची भेट घेणार; विलिनीकरणावर थेटच बोलले

सुनील तटकरे पुण्यात सुनेत्रा पवारांना भेटणार आहेत, यामुळे राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या चर्चांना वेग आला आहे. तटकरे म्हणाले, विलिनीकरणाचा निर्णय वहिनीच घेतील. शरद पवारांच्या भूमिकेवरही चर्चा अपेक्षित आहे. तसेच, राष्ट्रवादीला अर्थखातं मिळालंच पाहिजे, अशी त्यांची ठाम मागणी आहे. या भेटीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे.

राष्ट्रवादीत मोठी घडामोड, सुनील तटकरे थेट पुण्यात, सुनेत्रा पवारांची भेट घेणार; विलिनीकरणावर थेटच बोलले
sunil tatkare
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 10, 2026 | 11:12 AM

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर भाष्य करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादीकडून प्रतिक्रिया येत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार का? अशी चर्चा रंगली आहे. या सर्व घडामोडी घडत असतानाच सुनील तटकरे पुण्यात आले आहेत. तटकरे आज राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे या भेटीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलं आहे. या भेटीत राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा होणार का? याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.

खासदार सुनील तटकरे यांनी पुण्यातील विद्या प्रतिष्ठान येथील अजित पवार यांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधताना सुनेत्रा पवार यांची भेट घेणार असल्याचं स्पष्ट केलं. मी आईंना भेटणार आहे. त्यामुळे स्वाभाविकच वहिनींची भेट होणार आहे. काल वहिनींना फोन करून पुण्याला येत असल्याची कल्पना दिली होती. आईची भेट झाल्यावर वहिनींची भेट घेणार, असं सुनील तटकरे यांनी स्पष्ट केलं.

Loading...

निर्णय वहिनीच घेतील

यावेळी त्यांनी विलिनीकरणावरही भाष्य केलं. आज मी या पवित्र स्मृतीस्थळावर आहे. त्यामुळे इथे राजकीय वक्तव्य करण्याची गरज नाही. विलिनीकरणावर सुनेत्रा वहिनी निर्णय घेतील. शरद पवार साहेब सहा दशकं राजकारणात आहेत. त्यामुळे विलिनीकरणाचा निर्णय घ्यायचा की नाही तो त्यांचा निर्णय राहील, असं सांगतानाच मी दिवाळीनिमित्त खेडेगावात असतो. त्यामुळे अलिकडच्या काळातील घडामोडी मला माहीत नाही, असं तटकरे यांनी सांगितलं. आज विलिनीकरणाचा मुद्दाच समोर नाही. त्यावर भाष्य करणार नाही. मी भावनाप्रधान आहे. आज मला काही बोलता येणार नाही. पण वहिनींशी चर्चा करून योग्यवेळी त्यावर मी बोलेन, असं तटकरे म्हणाले.

जरतरवर बोलणार नाही

जरतरवर बोलणं योग्य ठरणार नाही. मी 40 वर्षापासून राजकारणात आहे. आजचा क्षण संवेदनशील आहे. मी उत्तर टाळत नाही. मी प्रदेशाध्यक्ष आहे. मी या संदर्भात मी कोणतंही भाष्य करणार नाही. मी वेगळ्या इमोशनमध्ये आहे, असंही त्यांनी सांगितलं.

अर्थखातं मिळालंच पाहिजे

राष्ट्रवादीला अर्थ खातं मिळालंच पाहिजे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. अर्थखातं आम्हाला मिळालंच पाहिजे. दादांनी विक्रमी अर्थसंकल्प दिलाय. मला 2010मध्ये अर्थसंकल्प सादर करण्याची संधी मिळाली होती. दादांनी 21 अर्थसंकल्प दिले. दादांचं राज्यात मोठं योगदान आहे. आम्हाला अर्थखातं मिळालंच पाहिजे, असं ते म्हणाले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us