
Leopard Attacks in Junnar: अंधारात जाऊन बोलण्याची सवय असेल तर आताच सावध व्हा. कारण सध्या अनेक ठिकाणी बिबट्याचा मुक्त संचार सुरू आहे. रात्री शिकारीसाठी बिबटे बाहेर पडतात. ते अंधारात सावज शोधतात. मानवी वस्ती भोवती बिबट्यांचा वावर वाढला आहे. अनेक ठिकाणी मनुष्य वस्तीवर त्यांनी हल्ले केले आहेत. दबा धरून बसलेले बिबटे केव्हा हल्ला करतील याची शाश्वती नाही. पुण्यातील नारायणगाव-जुन्नर रस्त्यालगत बिबट्याने अंधारात बोलणाऱ्या तरुणावर हल्ला केल्याचा थरार समोर आला आहे. नशीब बलवत्तर म्हणून हा तरूण बचावला आहे.
नशीब बलवत्तर म्हणून बचावला
नारायणगाव-जुन्नर रस्त्यालगत साकार नगरी सोसायटीजवळ हा थरार घडला. १८ वर्षीय तनिष नवनाथ परदेशी हा तरुण अंधारात बोलत होता. त्यावेळी रात्रीचे सव्वा आठ वाजले होते. हा तरुण फोनवर बोलण्यात गुंग असतानाच बिबट्याने त्याच्यावर हल्ला चढवला. बिबट्याचे नखे त्याच्या पोटरीवर आले. नखांचे मोठे ओरखडे झाले. तो जखमी झाला. नशीब बलवंतर म्हणून त्याला जीवदान मिळाले आहे. तनिषला तातडीने नारायणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची तब्येत सध्या स्थिर आहे.
तीन बिबटे आढळले
या घटनेनंतर वन विभागाच्या टीमने घटनास्थळी धाव घेतली. ड्रोनद्वारे वारुळवाडीतील मीनाक्षी कृपा वसतीगृह परिसरात २०० फूट अंतरावर तीन बिबटे आढळले. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. काल या परिसरात बिबट्यांनी चार पाळीव प्राण्यांवर हल्ला केला होता. वनविभागाने या परिसरात आठ पिंजरे लावले आहेत. जुन्नर तालुक्यात बिबट्यांच्या हल्ल्यांची वारंवारता वाढली असून शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीती आहे. पूर्वीच्या ओतूर, शेटेवाडी व शिवनेरीसारख्या घटनांमुळे वन्यजीव-मानव संघर्ष तीव्र झाला. रात्री मुक्त संचार टाळा व वनविभागाशी संपर्क साधा असे आवाहन करण्यात येत आहे.
बिबट्याचा धुमाकूळ
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द गावात रात्रीचा बिबट्याचा धुमाकूळ पाहायला मिळाला. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळील ईश्वरबुवा मंदिर परिसरात रात्री दोन बिबट्याचा रस्त्यावर मुक्तपणे फिरताना दिसले. स्थानिकांनी ही बिबट्याचे मोबाईलमध्ये व्हिडिओ काढले आहेत. स्थानिकांच्या माहितीनुसार, हे बिबटे भक्ष्याच्या शोधत रस्त्यालगत फिरत असताना वन विभागाला सूचना देण्यात आली. मात्र तेव्हापर्यंत ते बिबटे ऊसाच्या शेतात निघून गेले होते. अवसरी खुर्दसारख्या ग्रामीण भागात वन्यजीव-मानवी संघर्ष वाढतेय.म्हणून रात्रीच्या वेळी बाहेर पडू नये असे आवाहन वन विभागाने केले आहे.
धोलवडमध्ये बिबट्याचे दर्शन
जुन्नर तालुक्यातील धोलवड येथे बिबट्याचे दर्शन झाले आहे. स्तंभलेखक संजय नलावडे यांच्या घरासमोरच रात्री पावणेदोन वाजता बिबट्या आढलला. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, वन विभागाची कारवाई अपेक्षित नागरिक करत आहे. निसर्गरम्य धोलवड भागात बिबट्यांचा वावर वाढतेय.त्यामुळे नागरिकानी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.