ट्रक चालवत असताना चालकास ह्रदयविकाराचा झटका, पुढे असे घडले….
Pune Crime News | पुणे-सोलापूर महामार्गावर एक वेगळीच घटना घडली. ट्रक चालक गाडी चालवत असताना त्याच्या छातीत दुखू लागले. वेदना असहाय्य झाल्यानंतर त्याने ट्रक रस्त्याच्या बाजूला केला. त्यानंतर घरी कुटुंबियांना फोन केला. आपल्या छातीत वेदना होत असल्याचे सांगितले.
अभिजित पोते, पुणे, दि. 29 नोव्हेंबर 2023 | राष्ट्रीय महामार्गावर अनेक अपघात आणि दुर्घटना घडत असतात. त्यात कधी प्रवाशी जखमी होतात. काही अपघातांमध्ये प्रवाशांचा मृत्यू होतो. पुणे-सोलापूर महामार्गावर मंगळवारी रात्री वेगळची घटना घडली. एक ४५ वर्षीय चालक ट्रक चालवत होते. त्यावेळी त्याच्या छातीत दुखू लागले. वेदना असहाय्य झाल्यानंतर त्याने ट्रक रस्त्याच्या बाजूला केला. त्यानंतर घरी कुटुंबियांना फोन केला. आपल्या छातीत वेदना होत असल्याचे सांगितले. त्याचवेळी त्यांना ह्रदयविकाराचा जोरदार झटका आला. त्यात त्यांचा मृत्यू झाला. सतपाल झेटिंग कावळे (वय ४५ वर्ष) असे मृत्यू झालेल्या ट्रकचालकाचे नाव आहे. तो लातूर जिल्ह्यातील रहिवाशी आहे.
कुठे घडली घटना
लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतून पुणे सोलापूर महामार्गावर सतपाल कावळे ट्रक चालवत होता. कर्नाटकावरुन ते हा ट्रक चालवत येत होते. मंगळवारी रात्री माळीमळा गावात असताना सतपाल झेटिंग कावळे यांच्या छातीत वेदना होऊ लागल्या. मग त्यांनी ट्रक महामार्गाच्या एका बाजूला उभा केला. आपल्या कुटुंबियांना मोबाईलवरुन संपर्क केला. त्याच्या घरच्या मंडळींनी तुम्ही जेवण करा, थोडा आराम करा, त्यानंतर जवळपास कुठे डॉक्टर असल्यास त्यांना दाखवा, असे सांगितले. परंतु त्याचवेळी त्यांना हृदयविकाराचा जोरदार झटका आला. या झटक्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. कुटुंबियांना केलेला तो फोन त्यांचा अखेरचा ठरला. सतपाल कावळे हे लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील रामलिंग मुरडगड या गावातील रहिवाशी आहे. पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
घटनास्थळी ॲम्बुलन्स दाखल परंतु…
सतपाल कावळे यांनी ह्रदयविकारचा झटका आल्याची माहिती लोणी काळभोर येथील स्थानिक नागरिकांनी मिळाली. त्यांनी ही माहिती पोलीस आणि प्राथमिक आरोग्य केंद्राला दिली. त्यानंतर घटनास्थळी तातडीने रुग्णवाहिका पोलिसांनी बोलवली. रुग्णवाहिका आल्यावर डॉक्टरांनी कावळे यांची तपासणी केली असता त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर ही माहिती त्यांच्या कुटुंबियांना देण्यात आली.