Lalit Patil | पोलीस दल हादरले, ललित पाटील प्रकरणात सर्वात मोठी कारवाई
Lalit Patil | ललित पाटील ड्रग्स प्रकरणात प्रथमच मोठी कारवाई झाली आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना अटक झाल्याची ही पहिलीच कारवाई आहे. या प्रकरणात ससून रुग्णालयाचे डीन डॉक्टर संजीव ठाकूर यांच्यावर काही दिवसांपूर्वीच कारवाई झाली.
अभिजित पोते, पुणे | 17 नोव्हेंबर 2023 : ड्रग्स माफिया ललित पाटील प्रकरणात आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई करण्यात आली. आतापर्यंत ललित पाटील याला मदत करणारे त्याचे मित्र आणि त्याच्याशी संबंधित लोकांवर कारवाई करण्यात आली होती. परंतु आतापर्यंत शासकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर कारवाई झाली नव्हती. प्रथमच पुणे पोलिसांनी आपल्या पोलिसांवर मोठी कारवाई केली आहे. ड्रग्स प्रकरणात ललित पाटील याला मदत करणाऱ्या दोन पोलिसांना अटक केली आहे. या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. ललित पाटील पलायन प्रकरणात पुणे पोलिस दलातील २ कर्मचाऱ्यांना गुन्हे शाखेने अटक केली. नाथाराम काळे आणि अमित जाधव अशी अटक करण्यात आलेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत.
काय होते प्रकरण
ड्रग्स प्रकरणातील आरोपी ललित पाटील हा गेल्या तीन वर्षांपासून येरवडा कारागृहात आहे. परंतु तीन वर्षांपैकी नऊ महिने तो ससून रुग्णालयात दाखल होता. २ ऑक्टोबर रोजी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन तो फरार झाला. ससूनमधील रुग्णालयातील १६ या कैदी वॉर्डमधून तो फरार झाला होता. याप्रकरणात पुणे पोलिस आयुक्तांनी निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवत दोन महिला पोलीस अधिकाऱ्यांसह दहा पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना निलंबित केले होते. त्यानंतर आता प्रकरणाचा दीड- दोन महिन्यानंतर दोन पोलिसांना अटक केली आहे. या प्रकरणात ससून रुग्णालयातील एकाही कर्मचाऱ्यास अजून अटक झालेली नाही.
संजीव ठाकूरवर यापूर्वी कारवाई
ससून रुग्णालयाचे डीन डॉक्टर संजीव ठाकूर यांच्यावर काही दिवसांपूर्वीच कारवाई झाली. न्यायालयाने त्यांच्याविरोधात निर्णय दिल्यानंतर राज्य सरकारनेही त्यांना पदमुक्त केले. तसेच त्यांची विभागीय चौकशीचे आदेश दिले आहे. ससून रुग्णालयाचे आर्थोपेडीक सर्जन डॉक्टर प्रविण देवकाते यांच्यावर राज्य सरकारने कारवाई केली होती. त्यांचे निलंबन केले. ससून रुग्णालय प्रकरणात राज्य शासनाने चौकशी समिती नेमली होती. चौकशी समितीचा अहवाल आल्यानंतर अनेक दिवस काहीच कारवाई झाली नव्हती. अखेर न्यायालयाच्या निकालानंतर ठाकूर यांच्यावर कारवाई झाली. आता त्यानंतर दोन पोलिसांना अटक करण्यात आली.