शरद पवार गटाने पाठीत खंजीर खुपसला…. ठाकरे सेनेकडून मोठा हल्लाबोल… या बड्या नेत्याच्या वक्तव्याने धुसफूस चव्हाट्यावर
Sharad Pawar NCP, Thackeray Shiv Sena: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीत काल अर्ज मागे घेण्याच्या दिवशी मोठा ट्विस्ट आला. महाविकास आघाडीच्या काही उमेदवारांनी अचानक उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यावरून आता शरद पवार गट आणि ठाकरे सेनेतील धुसफूस चव्हाट्यावर आली आहे.

Vasant More on Sharad Pawar NCP: राज्यात काल विधान परिषद निवडणुकीवरून मोठे नाट्य आणि घडामोडी समोर आल्या. अर्ज माघार घेण्याच्या दिवशी महाविकास आघाडीतील काही उमेदवारांनी अचानक यु-टर्न घेतला. त्यांनी उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे राज्यात 6 ठिकाणी महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले. तर आता 11 ठिकाणी संख्याबळावर महायुतीचे पारडे जड दिसत आहे. या सर्व घडामोडींवर पुण्यातील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते वसंत मोरे यांनी मोठी नाराजी व्यक्त केली आहे. पुण्यात शरद पवार राष्ट्रवादीच्या भूमिकेवर वसंत मोरे यांनी तोंडसुख घेतले आहे.
तिसर्यांदा पुन्हा विश्वासघात
महाविकास आघाडीचा विश्वासघात झाला आहे, तिसऱ्यांदा विश्वासघात झाला आहे. अंकुश काकडे यांचा फॉर्म भरण्यासाठी फोन आला होता. शंभर टक्के सेटलमेंट आहे, भाऊबंदकी आहे. त्यांनी बारामतीत भाऊबंदकी करावी. ठाण्यात मदत केली. म्हणून साताऱ्यात शिवसेनेला मदत करणार आहे, असे वसंत मोरे म्हणाले. तर त्यांनी पुण्यातील घाडमोडींवर मोठे भाष्य केले आहे.
महाविकास आघाडीतून बाहेर पडा
शरद पवार गटाचे शहरात तीन नगरसेवक आहेत, त्यांनी विचार करायला पाहिजे. आमच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम शरद पवार गटाने केला आहे. महाविकास आघाडी कायम राहील की नाही वरिष्ठ पातळीवरचा निर्णय आहे. पुण्यात महाविकास आघाडीतून बाहेर पडा, मी वरिष्ठ नेत्यांना सांगितलं आहे. शरद पवार गटामुळे आम्ही महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा विचार केला आहे, असे मोठे वक्तव्य वसंत मोरे यांनी केले आहे. त्यामुळे पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव सेनेतील धुसपूस चव्हाट्यावर आल्याचे मानले जात आहे.
घोडेबाजार कसला, सेटलमेंट झाली
तर यावेळी दोन्ही राष्ट्रवादीतील भूमिकेवर वसंत मोरे यांनी मोठे भाष्य केले. विधान परिषद निवडणुकीतील अंतर्गत साटेलोट्यावर त्यांनी मोठे वक्तव्य केले आहे. दोन्ही राष्ट्रवादी आतून एक आहेत ही भाऊबंदकी आहे. याचे सर्व परिणाम महाविकास आघाडीला भोगावे लागतील. घोडेबाजार नाही सेटलमेंट झाली आहे, असा गंभीर आरोप वसंत मोरे यांनी पुण्यातील विधान परिषदेच्या घडामोडीवर केला आहे. प्रत्येक ठिकाणी तुम्ही जर भाऊबंदकी करणार असाल तर महाविकास आघाडीचे वाटोळं होणार आहेत. ठाकरे गटाला आणि आमच्या वरिष्ठांना अंधारात ठेवून हा निर्णय घेण्यात आला आहे, असा आरोपही वसंत मोरे यांनी केला आहे. त्यामुळे पुण्यातील महाविकास आघाडीतील दोन घटक पक्षात फाटल्याचे समोर येत आहे.