Vidyanand Bapat: DJला विरोध करणारे विद्यानंद बापट या संघटनेत प्रवेश करणार? मांडली स्पष्ट भूमिका
Vidyanand Bapat: डीजे आणि ध्वनीप्रदूशणाचा मुद्दा मांडत विद्यानंद बापट यांनी घेतलेल्या भूमिकेला अनेकांनी विरोध केला. आता ते एका संघटनेत प्रवेश करणार की नवी संघटना उभी करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पुण्यातील गणेशोत्सवात डीजे आणि लाऊडस्पीकरच्या कर्कश आवाजाविरोधात विद्यानंद बापट यांनी विरोध करत ठाम भूमिका मांडली. डीजे आणि ध्वनीप्रदूशणाचा मुद्दा मांडत त्यांनी घेतलेल्या ठाम भूमिकेने शहर आणि राज्यातील राजकीय-सामाजिक वातावरण तापले आहे. ते डीजे व लाऊडस्पीकरवर पूर्ण बंदीची मागणी करत आहेत. मात्र, या एकट्या लढ्याला व्यापक रूप देण्यासाठी ते नवीन संघटना स्थापन करणार की एखाद्या विद्यमान संघटनेत सामील होणार, याबाबत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
विद्यानंद बापट सुरु करणार वेगळी संघटना?
विद्यानंद बापट यांनी डीजेविरोधात एल्गार पुकारला असल्याने त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्नही झाला. तरीही ते मागे हटलेले नाहीत. ते आपल्या खास शैलीत डीजेविरोधात आवाज उठवत आहेत आणि त्यांचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांच्या शैलीचे कौतुक केले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बापट यांनी पहिल्यांदाच आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, “आम्ही वेगळी संघटना सुरू करू किंवा दुसऱ्या संघटनेत सामील होऊ, हा मुख्य मुद्दाच नाही. मुद्द्यांवर आधारित सहकार्य (इशू बेस्ड अलायन्स) हेच आमचे सूत्र असेल.”
विद्यानंद बापट यांनी उठवला आवाज
ध्वनीप्रदूषण निर्मूलनाच्या मुद्द्यावर पाठिंबा आणि एकमत असेल, त्या सर्वांचे सहकार्य घेतले जाईल. मग इतर शंभर विषयांवर मतभेद असले तरी चालतील, असे बापट म्हणाले. ध्वनीप्रदूषणाबाबत आता लोकांमध्ये जनजागृती वाढली असून नागरिक खुलेपणाने बोलू लागले आहेत. त्यामुळे या लढ्याला आपोआपच संघटित स्वरूप येत आहे. हा लढा केवळ सण-उत्सवांपुरता मर्यादित न ठेवता राजकीय प्रचारसभा आणि वाहतुकीच्या अडथळ्यांसारख्या मुद्द्यांपर्यंत नेऊन व्यापक समाजभान निर्माण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सध्या महाराष्ट्रात चांदा ते बांदा विद्यानंद बापट यांच्याच चर्चा सुरू आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते प्रत्येकाच्या मोबाईलपर्यंत पोहोचले आहेत. गणेशोत्सवात वाजणाऱ्या डीजेविरोधात त्यांनी एल्गार पुकारल्यामुळे त्यांना आता पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. गणेशोत्सव आता दहा दिवसांवर आला असून त्यानंतर नवरात्रीसह एकापाठोपाठ अनेक सण होऊ घातले आहेत. त्यात डीजेचा वापर करण्याला बापट यांनी प्रखर विरोध केला असल्याने त्यांच्या आवाजामुळे वादाचा दणदणाट होण्याची शक्यता आहे.
