रतन टाटांचा व्हिडीओ पाहिला अन् गुंतवणूक केली, महिलेची थेट पोलिसात धाव, नेमकं काय घडलं?

पुण्यातील एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका महिलेने दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांचा एक व्हिडीओ पाहिला आणि गुंतवणूक केली. त्यानंतर सत्य कळताच महिलेच्या पायाखालची जमीनच सरकरली. तिने पोलिसात धाव घेतली.

रतन टाटांचा व्हिडीओ पाहिला अन् गुंतवणूक केली, महिलेची थेट पोलिसात धाव, नेमकं काय घडलं?
सांकेतिक फोटो
Image Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Aug 10, 2026 | 8:42 AM

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या डीपफेक व्हिडिओद्वारे फसवणुक झाल्याची घटना घडल्यानंतर आता दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांचा डीपफेक व्हिडिओ तयार करून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. सायबर चोरट्यांनी बनावट व्हिडिओ तयार करून एका महिलेची चार लाख नऊ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. याबाबत भारतीय विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

महिलेची फसवणूक

घटना पुणे शहरातील आहे. सायबर गुन्हेगारांनी दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांचे डीपफेक व्हिडिओ तयार केले. या व्हिडिओमध्ये टाटा यांना विशिष्ट गुंतवणूक योजनेची किंवा आर्थिक लाभाची हमी देत असल्याचे दाखवण्यात आले. या बनावट व्हिडिओच्या आधारे एका महिलेला फसवण्यात आले. तिच्याकडून एकूण चार लाख नऊ हजार रुपये हस्तगत करण्यात आले.

यापूर्वीही निर्मला सीतारामन यांच्या डीपफेक व्हिडिओचा वापर करून फसवणुकीच्या घटना घडल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर रतन टाटा यांच्या नावाचा गैरवापर करण्याचा हा नवा प्रकार समोर आला आहे. डीपफेक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रसिद्ध व्यक्तींच्या आवाजात आणि चेहऱ्यात बनावट व्हिडिओ तयार करणे सोपे झाले आहे. याचा गैरफायदा घेत सायबर चोरटे नागरिकांची आर्थिक फसवणूक करत आहेत.

पीडित महिलेने भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी संबंधित गुन्ह्याची नोंद केली आहे. सध्या तपासात सायबर चोरट्यांचा शोध सुरू आहे. पोलिसांनी नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. कोणत्याही प्रसिद्ध व्यक्तीच्या व्हिडिओ किंवा संदेशाच्या आधारे आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी अधिकृत माध्यमांतून पडताळणी करण्याची गरज आहे, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

डीपफेक व्हिडिओंद्वारे होणाऱ्या फसवणुकीच्या घटना वाढत असल्याने नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. संशयास्पद व्हिडिओ किंवा संदेश आल्यास तात्काळ पोलीस किंवा सायबर सेलशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

याआधीही घडला होता प्रकार

यापूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये त्या दावा करताना दाखवण्यात आला होत्या की, २२ हजार रुपये गुंतवून दर महिना ३० लाख रुपयेपर्यंत कमाई करता येते. व्हिडिओमध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना या कथित गुंतवणूक योजनेला पाठिंबा देताना दाखवले होते. पुण्यातील घोरपडी परिसरात राहणाऱ्या सेवानिवृत्त हवाई दल अधिकाऱ्याने हा व्हिडीओ पाहिला आणि गुंतवणूक केली. त्यामध्ये त्यांचे १ कोटी ७ लाख रुपये गेले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us