संसदेत रिया चक्रवर्ती हिचं नाव घेऊन ठाकरे पिता-पुत्रांवर गंभीर आरोप, ठाकरे गट आक्रमक, लोकसभा अध्यक्षांनी दिले महत्त्वाचे आदेश
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांच्यावर लोकसभेत गंभीर आरोप केले. त्यामुळे एकच खळबळ उडालीय.

नवी दिल्ली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांच्यावर लोकसभेत गंभीर आरोप केले. त्यांच्या आरोपांवर ठाकरे गटाचे खासदार आक्रमक झाले. त्यांनी लोकसभा अध्यक्षांकडे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याबद्दल करण्यात आलेला उल्लेख लोकसभेच्या कामकाजातून काढून टाकावे, अशी मागणी केली. त्यांच्या ही मागणी लोकसभा अध्यक्षांनी मान्य केलीय. त्यामुळे राहुल शेवाळे यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याबद्दल केलेलं वक्तव्य लोकसभा कामकाजातून वगळण्यात आलंय.
राहुल शेवाळे यांचं वक्तव्य पटलावरुन काढण्याची मागणी ठाकरे गटाने केली होती. त्यानंतर आता शेवाळेंचं वक्तव्य पटलावरुन काढण्यात आलं आहे.
ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी याबद्दल माहिती दिलीय. “एका खासदाराने सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालियन यांच्या आत्महत्या प्रकरणात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे आरोपी आहेत, असं दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यांचा हा प्रयत्न अतिशय निषेधार्य आहे”, अशी भूमिका विनायक राऊत यांनी मांडली.
“आम्ही लोकसभा अध्यक्षांकडे हरकत घेऊन आदित्य ठाकरे यांचा केलेला उल्लेख सभागृहाच्या कामकाजातून काढून टाकावं, अशी मागणी केली. लोकसभा अध्यक्षांनी तो आग्रह मान्य केला”, अशी प्रतिक्रिया विनायक राऊत यांनी दिली.
राहुल शेवाळे नेमकं काय म्हणाले?
“सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीच्या फोनवर AU नावाने कॉल आले होते. AU म्हणजे आदित्य आणि उद्धव असं बिहार पोलिसांनी सांगितलं”, असा गंभीर आरोप राहुल शेवाळेंनी केलाय.
“सुशांत आत्महत्या प्रकरणी मुंबई पोलीस, बिहार पोलीस आणि सीबीआयने चौकशी केली होती. पण अजूनही अनेक प्रश्नांचं उत्तरं लोकांना मिळालेली नाहीत”, असं राहुल शेवाळे म्हणाले.
“सुशांतच्या मृत्यूप्रकरणी सीबीआय तपास कुठपर्यंत पोहोचलाय? याप्रकरणी सीबीआय अंतिम निष्कर्षापर्यंत पोहोचलीय का? सुशांतच्या शरीरावर मारहाण केल्याचे निशाण होते का? सुशांत आणि त्याची माजी मॅनेजर दिशा सालियनची फोनवर झालेल्या बातचितचा तपास झालाय का?”, असे सवाल राहुल शेवाळे यांनी केले.
“या प्रकरणात AU चं नाव आलंय. रिया चक्रवर्तीला AU नावाने 44 फोन आले. लिगलमध्ये AU अनन्या उदास बोलतात. पण बिहार पोलिसांच्या तपासात आदित्य आणि उद्धव असं नाव समोर आलं होतं. त्यामुळे या प्रकरणी सखोल चौकशी व्हायला हवी”, अशी मागणी राहुल शेवाळे यांनी लोकसभेत केली.
