‘तुमच्या मतांची भीक आम्हाला नको’, राहुरीच्या भाजप आमदाराची भाषा व्हायरल
MLA Akshay Kardile : अहिल्यानगर बंद दरम्यान भाजप आमदार अक्षय कर्डिले यांनी एक अत्यंत वादग्रस्त विधान केले आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलं ते सविस्तर जाणून घेऊयात.

अहिल्यानगर महानगरपालिकेच्या विद्युत विभागातील कर्मचारी धीरज परदेशी यांच्यावर 4 दिवसांपूर्वी मुकुंदनगर परिसरात प्राणघातक हल्ला झाला होता. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या धीरज परदेशी यांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. या हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या अहिल्यानगर बंद दरम्यान भाजप आमदार अक्षय कर्डिले यांनी एक अत्यंत वादग्रस्त विधान केले आहे. ‘आम्हाला तुमच्या मतांची भीक नको आणि तुम्ही पण आमच्याकडे काम घेऊन भीक मागायला येऊ नका,’ असे संतप्त उद्गार त्यांनी काढले आहेत.
काय म्हणाले अक्षय कर्डिले?
अहिल्यानगर बंद दरम्यान बोलताना भाजप आमदार अक्षय कर्डिले यांनी म्हटले की, आरोपींना अटक करता येत नसेल तर आम्हाला सांगा, इथे बसलेले जर मुकुंदनगरमध्ये घुसले तर एकही जिवंत राहणार नाही. यांना गजाआड न करता त्यांची मुंडकी छाटली पाहिजेत. त्याशिवाय त्यांची वळवळ थांबायची नाही. त्यांनी 3 दिवसांपासून लावलं आहे की हे राजकारण आहे. तुम्हाला माझ्या बापानेही सांगितलं होतं, तुमची मतं तुम्हालाच राहुद्या. आम्हाला तुमच्या मतांची भीक नको आणि तुम्ही पण आमच्याकडे काम घेऊन येऊ नका. कुत्र्याचं शेपूट वाकडं असतं. पण हे कुत्र्याचं नसून डुकराचं आहे. कितीही काहीही केलं तरी ते सरळ होत नाही, ते कापावेचं लागतं.
नेमकं काय घडलं?
महापालिकेच्या विद्यूतनगर विभागातील कर्मचारी धीरज परदेशी यांच्यावर दिनांक 7 ऑगस्ट रोजी सहा ते आठ जणांनी जीवघेणा हल्ला केला. मुकुंदनगरमधील दर्गा दायरा परिसरात हा हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात परदेशी गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, तीन दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर 9 ऑगस्ट रोजी त्यांचा मृत्यू झाला. परदेशी यांच्यावर झालेल्या या हल्ल्याच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनांनी बंदची हाक दिली होती. त्यानंतर कापडबाजार, गंजबाजार, मोची गल्ली, माळीवाडा, दिल्लीगेट, तसेच उपनगरातील बालिकाश्रम रोड, प्रोफेसर कॉलनी चौक, पाइपलाइन रोड आदी भागात बंद पाळण्यात आला.
अहिल्यानगर शहरात आंदोलनही करण्यात आले. यावेळी आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा. देवाभाऊंना फोन करा, अशा घोषणा आंदोलक देत होते. हे आंदोलन सुरू असतानाच आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन केला. यावेळी फडणवीसांनी कडक कारवाई करण्याचं आश्वासन दिल्यानंतर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आलं.