Maharashtra Rain Update : फटाके वाजवायचे की भिजवायचे? राज्यात पुन्हा एकदा जोरदार पावसाची हजेरी
राज्यात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे, मुंबईसह अनेक भागांमध्ये आज पावसाने हजेरी लावली, आता पुन्हा एकदा या पावसाचा मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे.

यंदा राज्यात पावसानं धुमाकूळ घातला, महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे, महाराष्ट्रात मान्सूनचा पाऊस चांगलाच बरसला, पावसामुळे नद्यांना पूर आला, या पुरामुळे शेतकऱ्यांच्या ऐन हाता-तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला गेला. शेतकरी हवालदिल झाले. अनेकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे प्रचंड नुकसान झालं. संसार देखील पाण्यात वाहून गेला. दरम्यान महाराष्ट्रावरील पावसाचं हे संकट आता टळलं आहे, असं वाटत असतानाच आता पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे. जाणून घेऊयात पावसाचे सर्व अपडेटस्.
मुंबईमध्ये पावसाची हजेरी
मुंबईमध्ये आज पुन्हा एकदा पावसानं हजेरी लावली आहे, मुंबई आणि मुंबईच्या उपनगरांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस झाला, या पावसामुळे कामावरून परतणाऱ्या नोकरदार वर्गांचे चांगलेच हाल झाले.
भिवंडीत पाऊस
दुसरीकडे भिवंडी शहरात देखील पुन्हा एकदा पावसानं दमदार हजेरी लावली आहे. ढगांच्या गडगडासह जोरदार पावसानं हजेरी लावली, अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. मात्र या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाल्यानं नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे.
मीरा भाईंदरमध्ये पाऊस
पंधरा दिवसांच्या विश्रांतीनंतर मीरा-भाईंदरमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. वादळी वाऱ्यासह अचानक सुरू झालेल्या पावसामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. दिवाळीचे दिवस असल्याने अनेक ठिकाणी फटाक्यांचे स्टॉल लावण्यात आले आहेत, अचानक आलेल्या पावसामुळे फटाका व्यावसायिकांची देखील चांगलीच धावपळ उडाली.
पालघरमध्येही पावसाचा दणका
दरम्यान दुसरीकडे पालघ जिल्ह्यातील ग्रामीण भागांमध्ये आज जोरदार पाऊस झाला, या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणी धान पिकाची कापणी करून पीक शेतात ठेवण्यात आलं आहे, या पावसामुळे धान पिकाला मोठा फटका बसण्याची शक्यता असून, पुन्हा एकदा शेतकरी संकटात सापडले आहेत. मुंबई, मुंबई उपनगर, पालघरसह इतरही अनेक ठिकाणी आज पावसानं हजेरी लावली असून, पुन्हा एकदा हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
