Mumbai, Maharashtra Weather Update : मुंबईसह राज्यातील अनेक भागांमध्ये पुन्हा पावसाला सुरुवात, कुठे-कुठे पावसाची हजेरी?

राज्यात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे, ऐन दिवाळीत पावसाला सुरुवात झाल्यानं शॉपिंगसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची तसेच फटाका दुकानदारांसह इतर व्यावसायिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे.

Mumbai, Maharashtra Weather Update : मुंबईसह राज्यातील अनेक भागांमध्ये पुन्हा पावसाला सुरुवात, कुठे-कुठे पावसाची हजेरी?
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 21, 2025 | 8:23 PM

राज्यात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे, मुंबईसह राज्यातील अनेक भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसानं हजेरी लावली आहे. ऐन दिवाळीत पाऊस सुरू झाल्यानं खरेदीसाठी घरातून बाहेर पडलेल्या नागरिकांची तसेच दुकानदारांची चांगलीच तारांबळ उडाल्याचं चित्र पहायला मिळत आहे. अचानक आलेल्या पावसामुळे फटाका व्यावसायिकांची देखील चांगलीच धावपळ उडाली, मुंबई, कल्याण, ठाणे, बलदापूर आणि नाशिक जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला आहे.

मुंबईत पावसाची हजेरी 

आज सायंकाळच्या सुमारास मुंबईमध्ये पावसानं हजेरी लावली आहे. मुंबईच्या दादर परिसरामध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला आहे, दिवाळीनिमित्त दादरच्या मार्केटमध्ये खरेदीसाठी मोठी गर्दी असतानाच अचानक पावसला सुरुवात झाली.

ठाण्यात पाऊस 

दरम्यान दुसरीकडे ठाण्यात देखील जोरदार पाऊस झाला आहे, ठाण्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडला, या पावसामुळे खरेदीसाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे, ऐन दिवाळी सणावर पावसाचं सावट पहायला मिळत आहे.  दरम्यान पुढील दोन ते तीन दिवस हवामान खात्याकडून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

कल्याणमध्ये पाऊस   

कल्याणमध्ये अचानक वातावरणात बदल झाला, त्यानंतर काही वेळाताच शहरासह परिसरात वीजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे वाहन चालवताना वाहनचालकांवर चांगलीच तारेवरची कसरत करण्याची वेळ आली आहे. तर काही भागांमध्ये पावसाला सुरुवात होताच वीज पुरवठा खंडित झाल्यानं ऐन दिवाळीत नागरिकांवर अंधारात राहण्याची वेळ आली आहे.  अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची देखील चांगलीच धावपळ उडाली.  दरम्यान पावसाचा जोर कायम राहिल्यास  सखल भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता आहे.

बदलापूरमध्ये पाऊस  

दुसरीकडे बदलापूरमध्ये देखील आज पावसानं हजेरी लावली आहे, शहरात हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला, या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाल्यानं नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.

नाशिक जिल्ह्यात पाऊस

दुसरीकडे मुंबई वगळता नाशिक जिल्ह्यातल्या काही भागांमध्ये देखील पाऊस झाला आहे. नाशिकच्या निफाडमध्ये काही वेळ चांगलाच पाऊस झाला, या पावसाचा शेतीला फटका बसण्याची शक्यता आहे.