युपी बिहारनंतर राज ठाकरे प्रथमच या राज्यावर घसरले, प्रथमच केली जहरी टीका

राज ठाकरे यावेळी म्हणाले की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा हिंदीसाठी भांडतोय. मराठी सक्तीची हवी, इतर शाळातही मराठी सक्तीची केली पाहिजे ते सोडून हिंदी सक्तीची का करीत आहात, कोण तुमच्यावर दबाव टाकत आहे असा सवाल ठाकरे यांनी भाषणात केला.

युपी बिहारनंतर राज ठाकरे प्रथमच या राज्यावर घसरले, प्रथमच केली जहरी टीका
raj thackeray speech on miraroad
| Updated on: Jul 18, 2025 | 10:10 PM

महाराष्ट्रात हिंदी भाषेच्या सक्तीवरुन वातावरण तापलेले असताना राज ठाकरे यांचे मीरारोड येथे जोरदार भाषण झाले.या भाषणात राज ठाकरे यांनी नेहमीच्या ठाकरी शैलीत राज्य सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कोरडे ओढले.परंतू या भाषणात राज ठाकरे यांनी प्रथमच गुजराती भाषिकांच्या विरोधात जोरदार टीका केली आहे. याआधी राज ठाकरे यांनी युपी बिहारवाल्यांना झोडले आहे,परंतू पहिल्यांदाच त्यांनी गुजराती भाषिक आणि गुजरातला टार्गेट केले आहे.

राज ठाकरे यावेळी म्हणाले की महाराष्ट्रावर पूर्वीपासून केंद्राचा दबाव आलेला आहे. केंद्राचं हे पूर्वीपासूनचं आहे.काँग्रेस असल्यापासूनचं हे सगळं सुरु आहे. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला.त्यासाठी प्रचंड मोठा लढा झाला. मुंबई महाराष्ट्रापासून बाजूला करण्याचा डाव होता. काही गुजराती व्यापारी आणि नेत्यांचा होता असा थेट आरोप राज ठाकरे यांनी प्रथमच केला.

… ही पहिली मागणी सरदार पटेल यांनी केली

राज ठाकरे म्हणाले की अत्रेंचे पुस्तक वाचत असताना मला एका गोष्टीचा धक्का बसला. मुंबई महाराष्ट्राला मिळू नये ही पहिली मागणी सरदार वल्लभभाई पटेल यांनी केली होती. वल्लभभाई पटेलांनी. आपण त्यांना लोहपुरुष म्हणून मानत आलो. देशाचे गृहमंत्री. तुम्ही महाराष्ट्राला विरोध केला. ज्या ज्या वेळी महाराष्ट्रात आंदोलनं झाली. तेव्हा मोरारजी देसाई यांनी गोळीबार करून मराठी माणसांना ठार मारलं. अनेक वर्षापासून त्यांचा मुंबईवर डोळा आहे.हे सर्वकाही सहज होत नाही. हे चाचपडून पाहत आहे. हिंदी भाषा आणली बघू महाराष्ट्र विरोध करतो का ? मराठी माणूस पेटतोय का? तो शांत दिसला तर हिंदी भाषा आणणं ही त्यांची पहिली पायरी असेल. हळूहळू मुंबई ताब्यात घ्यायची आणि गुजरातला द्यायची ही त्यांची स्वप्न आहेत असा थेट आरोप राज ठाकरे यांनी या भाषणात पहिल्यांदाच केला आहे.

हा सर्व पट्टा गुजरातला मिळवण्यासाठी

राज ठाकरे यावेळी म्हणाले की आम्ही हिंदू आहोत, हिंदी नाही. हिंदुत्वाच्या बुरख्य खालून माझी मराठी संपवायला येणार असाल तर माझ्या सारखा कडवट मराठी सापडणार नाही. हिंमत असेल तर हात लावून दाखवा. हे सर्व षडयंत्र समजून घ्या. मुंबईला हात लावायचं असेल तर सर्व मतदारसंघ यांना अमराठी लोकांचे करायचे आहेत असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले. राज ठाकरे पुढे म्हणाले की हे गेले २० वर्ष मी बोंबलून सांगतोय. नुसती माणसं येत नाही. इमारती उभ्या राहतात आणि माणसं येतात. नुसती माणसं येत नाही. हे मतदारसंघ बनवत आहे. मतदारसंघ बनवून तुम्हाला हटवणार. आमचाच आमदार, खासदार आणि महापौर आणि हा सर्व पट्टा गुजरातला मिळवण्यासाठीचे खटाटोप सुरू आहे. हे आज नाही. पूर्वीपासून सुरू आहे. आता या लपूनछपून हळूवारपणे सुरू आहे. हे षडयंत्र नीट ओळखा समजून घ्या, सहज आलेला हा माज नाही. तुमच्या अंगावर येतात आणि मराठी बोलणार नाही हे सागंतात हा माज तिथून आला आहे असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले.

हिंदीने  २५० भाषा मारल्या

हिंदी ही इकडच्या तिकडच्या कडबोळ्यातून तयार झालेली भाषा. उत्तर प्रदेश, बिहार आणि राजस्थानला समजलं पाहिजे. हिंदीने किती भाषा मारल्या तर २५० भाषा मारल्या आहेत. कानगडी, गढवाली, ब्रज भोजपुरी, माळवी, बिल्ली, पागरी, मारवाडी, अशा अनेक भाषा आहेत. बिहारमध्ये त्यांनी हिंदी स्वीकारली आहे. तिथे ९९ टक्के लोकं मातृभाषेत बोलतात. हिंदीत बोलत नाहीत. हनुमान चालिसा त्याला हे हिंदी म्हणतात पण ती अवधीत आहे. हिंदीत नाही. पहिल्यांदा भाषा नीट समजून घेतली पाहिजे असेही राज ठाकरे यांनी हिंदी भाषेविषयी बोलताना सांगितले.

माझे सर्व भाषेवर प्रेम

मराठी भाषेचा इतिहास समजून घेतला पाहिजे. यांचं भाषेवर प्रेम नाही. माझं सर्व भाषेवर प्रेम आहे. महाराष्ट्रातील जे काही नेते आहेत त्यांच्या पेक्षा माझं हिंदी बरं आहे. त्याचं कारण माझे वडील. माझ्या वडिलांना व्याकरणासकट मराठी, हिंदी, इंग्रजी आणि ऊर्दू येत होतं. भाषा कोणतीही वाईट नसते. हिंदी वाईट भाषा नाही.पण, आमच्यावर लादणार असाल तर नाही बोलणार जा. लहान मुलांवर तर नाहीच नाही. काही विषयच नाही. यांचं राजकारण काय चालू आहे ते पहिलं पाहा असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले.