…अन् राज ठाकरेंनी व्यक्त केली दिलगिरी, मेळाव्यात नेमकं काय विसरले?
आज मुंबईमध्ये मराठी माणसांचा विजयी मेळावा पार पडला, या मेळाव्याला दोन्ही ठाकरे बंधूंची उपस्थिती होती. यावेळी मराठीच्या मुद्द्यावरून जोरदार हल्लाबोल करण्यात आला.

राज्यात हिंदीच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलंच तापलं होतं. पहिलीपासून हिंदीची सक्ती नको अशी भूमिका राज्यातील अनेक पक्ष आणि संघटनांची होती. मनसेनं या विरोधात रस्त्यावर उतरत मोठं आंदोलन उभारलं, त्यानंतर शिवसेना ठाकरे गटानं देखील या आंदोलनात उडी घेतली. अखेर सरकारने काही दिवसांपूर्वी त्रिभाषा सूत्राचा जीआर रद्द केला, त्यानंतर आज मुंबईमध्ये मराठी माणसाचा विजय मेळावा पार पडला.
या मेळाव्याला दोन्ही ठाकरे बंधू शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे उपस्थित होते. मराठीच्या मुद्द्यावर ठाकरे बंधू काय बोलणार याकडे सर्व राज्याचं लक्ष लागलं होतं? या मेळाव्यातून जोरदार हल्लाबोल करण्यात आला. मात्र या मेळाव्यानंतर राज ठाकरे यांनी एक ट्विट केलं आहे. त्या ट्विटमध्ये त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.
नेमकं काय म्हणाले राज ठाकरे?
‘हिंदी सक्तीच्या बाबतीत मराठी माणसाने सरकारला झुकवलं त्यानंतर आज मुंबईत मराठी माणसांचा विजयी मेळावा झाला. या मेळाव्यात माझ्याकडून एक उल्लेख राहून गेला, त्याबद्दल आधीच दिलगीरी व्यक्त करतो. हिंदी सक्तीच्या विरोधात मराठी वृत्तवाहिन्या, मराठी वर्तमानपत्रं, मराठीसाठी काम करणाऱ्या संस्था, अनेक दबावगट, तसेच काही मोजके कलाकार हे या लढ्याच्या वेळेस ठाम उभे राहिले त्या सगळ्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन आणि आभार. मराठी अस्मितेसाठी ही झालेली एकजूट अशीच कायम राहील. पुन्हा एकदा मनापासून सगळ्यांचे मी आभार मानतो. राज ठाकरे ।’ असं ट्विट राज ठाकरे यांनी केलं आहे.
हिंदी सक्तीच्या बाबतीत मराठी माणसाने सरकारला झुकवलं त्यानंतर आज मुंबईत मराठी माणसांचा विजयी मेळावा झाला. या मेळाव्यात माझ्याकडून एक उल्लेख राहून गेला, त्याबद्दल आधीच दिलगीरी व्यक्त करतो. हिंदी सक्तीच्या विरोधात मराठी वृत्तवाहिन्या, मराठी वर्तमानपत्रं, मराठीसाठी काम करणाऱ्या…
— Raj Thackeray (@RajThackeray) July 5, 2025
राज्य भरात कायकर्त्यांचा जल्लोष
आज मुंबईमध्ये मराठी माणसाचा विजयी मेळावा पार पडला, या मेळाव्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले, गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या कार्यकर्त्यांची असलेली ही इच्छा या निमित्तानं पूर्ण झाली. त्यामुळे आज राज्यातील अनेक ठिकाणी मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केल्याचं पाहायला मिळालं.