
आज शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे, बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे, यानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजळला दिला, बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणीला उजाळा देताना राज ठाकरे चांगलेच भावूक झाले, तसेच यावेळी बोलताना त्यांनी सध्या सुरू असलेल्या राजकीय परिस्थितीचा देखील आपल्या खास शैलीमध्ये समाचार घेतला आहे. ‘बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दी वर्ष सुरू होतंय. सामनात माझा आज एक लेख आला आहे. मी त्यात त्यांच्याविषयी अनेक आठवणी लिहिल्या आहेत. खरंतर त्या व्यक्तीला कसं पाहायचं? कसं मांडायचं? हे माझ्यासमोर अनेकदा प्रश्न उभे राहतात. काका म्हणून मांडायचं? व्यंगचित्रकार म्हणून मांडायचं की शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट म्हणून मांडायचं? त्यांच्यावर बोलायचं म्हटलं तर मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो, मी आणि उद्धव तुमच्याशी तास न् तास बोलू शकतो, असं यावेळी राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?
आज इथे बाळासाहेब असायला हवे होते असं म्हटलं होतं. आज गुलामांचा बाजार झाला आहे. हे सर्व महाराष्ट्रातील चित्र पाहिल्यानंतर आज मला वाटतं की बाळासाहेब नाहीत ते बरं आहे. तो माणूस किती व्यथित झाला असता त्या माणसाला काय त्रास झाला असता. हे चित्र समोर उभं राहिलं आहे महाराष्ट्रात. पूर्वी दोन शे वर्षापूर्वी चावडीवर उभं राहून माणसांचे लिलाव चालायचे. आजही ते लिलाव सुरू आहेत, कल्याण डोंबिवली ठाणे अशा अनेक ठिकाणी हे सर्व सुरू आहे. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याशी बोलणं झालं, परिस्थिती पाहून शिसारी आली, असा हल्लाबोल यावेळी राज ठाकरे यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर बोलताना केला आहे.
आज ही परिस्थिती पाहायला बाळासाहेब नाहीत ही चांगली गोष्ट आहे, तो माणूस हे पाहूच शकला नसता. ज्या गोष्टी शून्यातून उभ्या केल्या. बाकीच्या पक्षात बघा, अनेक लोकं दिसतील जे बाळासाहेबांनी उभे केले आहेत. पण ज्या गोष्टी घडत जातात, घडत गेल्या, मी ज्यावेळी पक्षातून बाहेर पडलो त्याच्या वेदना वेगळ्या होत्या. माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं तर माझ्यसाठी घर सोडणं होतं. २० वर्षांचा काळ निघून गेला, अनेक गोष्टी मलाही उमजल्या, मला वाटतं अनेक गोष्टी उद्धव यांनाही उमजल्या असतील, असं यावेळी राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.