Raj-Uddhav Thackrey : महाराष्ट्रात पहिल्यांदाच घडणार.. उद्धव-राज ठाकरे एकत्र मोर्चात ! संजय राऊतांचं ट्विट काय ?

हिंदी लादण्याच्या प्रस्तावाविरोधात महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापले आहे. मनसेने ठाकरे गटाला एकत्रित मोर्चा काढण्याचा प्रस्ताव दिला होता. संजय राऊतांनी ट्विट करून आता महत्वाची अपडेट दिली आहे.

Raj-Uddhav Thackrey : महाराष्ट्रात पहिल्यांदाच घडणार.. उद्धव-राज ठाकरे एकत्र मोर्चात ! संजय राऊतांचं ट्विट काय ?
उद्धव ठाकरे - राज ठाकरे
| Updated on: Jun 27, 2025 | 10:27 AM

हिंदी सक्तीविरोधात राज्यातील वातावरण तापलं असून विविध राजकीय पक्षांनी या पार्शअवभूमीवर ठाम भूमिका घेतली आहे. दरम्यान हिंदी सक्तीविरोधात मनसेकडून ठाकरेंच्या शिवसेनेला प्रस्ताव देण्यात आला होता. हिंदी सक्तीविरोधात एकच मोर्चा हवा, दोन मोर्चे नको,असा मनसेचा आग्रह होता. आता याचसंदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. हिंदी सक्तीविरोधात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल, असं संजय राऊतांनी म्हटलं आहे. X ( पूर्वीचं ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक ट्विट करत राऊतांनी ही माहिती दिली आहे. त्यामुळे आता राज आणि उद्धव हे दोन्ही ठाकरे बंधू या मोर्चामध्ये एकत्र पहायला मिळतील अशी शक्यता निर्माण झाली आहे.

‘महाराष्ट्रतील शाळांत हिंदी सक्ती विरोधात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल! जय महाराष्ट्र!’ असं ट्विट करतानाच संजय राऊतांनी उद्धव व राज ठाकरे यांचा एकत्र फोटोही पोस्ट केला आहे. राज ठाकरे यांनीदेखील उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांसोबत या मोर्चासंबंधी चर्चा केल्याची माहिती मिळत आहे. आपण सर्वच राजकीय पक्षांसोबत बोलणार, असं कालचं राज ठाकरे यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आता संजय राऊतांचं हे ट्विट समोर आलं असून त्यामुळे दोन्ही ठाकरे बंधून हिंदी सक्तीविरोधातील मोर्चामध्ये एकत्र दिसण्याची दाट शक्यता आहे.

संजय राऊतांचं ट्विट 

ठाकरे बंधू एकत्र येणार अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात होत असून त्याची पहिली झलक कदाचित हिंदी सक्तीविरोधातील या मोर्च्यामधून दिसू शकते. 5 जुलै रोजी या मोर्च्याचं आयोजन करण्यात आलं आहे. सुरूवातील 6 जुलैची घोषणा करण्यात आली होती मात्र त्यानंतर 5 जुलै ही मोर्चाची तारीख ठरवण्यात आली आहे. त्यामध्ये राज आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही ठाकरे बंधू या मोर्च्याचं नेतृत्व करताना पहायला मिळू शकतात. त्याचसोबत इतरही राजकीय पक्षातील नेते या मोर्चात सहभागी होण्याची शक्यता आहे.

मराठीच्या एकजुटीसाठी तमाम मराठी माणसांनी एकत्र येण्याची गरज 

यावर आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मराठीच्या मुद्यापेक्षा मला माझा अहंकार मोठा नाही असं मनसे प्रमुख राज ठाकरे म्हणाले होते. मराठीचं हित, महाराष्ट्राचं हित जे करतील आणि महाराष्ट्राचं अहित जे करतील त्यांना सोडून आपण उभं राहीलं पाहिजे,असं मा. उद्धव ठाकरे म्हणाले होते.मुखात एक आणि प्रत्यक्षात एक असं वागणं असलेल्यांपासू सावध राहिलं पाहिजे, असंही ते म्हणाले होते. आज महाराष्ट्राला मराठी माणसाच्या एकजुटीची अतिशय गरज आहे, तमाम मराठी माणसांनी एकत्र आलं पाहिजे अशी भावना सावंत यांनी व्यक्त केली.

तर महाराष्ट्राच्या मराठी माणसाची ताकद ही एकत्रितपणे दिसणं आवश्यक आहे. ज्या पद्धतीने महाराष्ट्रावर हिंदीची सक्ती लादण्याचा प्रयत्न होतोय, महाराष्ट्रात राहूनच मराठी भाषेची गळचेपी करण्याचा प्रयत्न होत असेल तर मराठी म्हणून आपण सरवांनी एकत्र अंगावर जाणं महत्वाचं आहे, गरजेचं आहे ही भूमिका काल मा. राज ठाकरे यांनी मांडली. त्या भूमिकेला सर्वांनीच प्रतिसाद दिला आहे, त्यादृष्टीने पडलेलं हे महत्वाचं पाऊल आहे, असं मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले.

रोहित पवारांचं ट्विटही चर्चेत

राष्ट्ववादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते, आमदार रोहित पवार यांनीही एक ट्विट केलं असून ते चर्चेत आहे.