Raj-Uddhav Thackeray Vijay Melava : मराठी माणसांनो सावधान… राज ठाकरेंनी सांगितला पुढचा धोका… काय म्हणाले राज ?
महाराष्ट्रात शाळांमध्ये हिंदी सक्तीच्या निर्णयाविरोधात मोठे आंदोलन झाले. शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसेने या निर्णयाचा कडाडून विरोध केला. जनतेच्या व्यापक विरोधामुळे सरकारने हा निर्णय मागे घेतला. या विजयानिमित्त वरळी येथे एक मेळावा झाला, जिथे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी भाषणे केली. त्यांनी मराठी भाषेच्या संरक्षणासाठी जनतेला एकत्र येण्याचे आवाहन केले आणि राजकारणातून जातीय फूट निर्माण होण्याचा इशारा दिला.

राज्यातील शाळांमधील हिंदी सक्तीच्या मुद्यावरून अख्खा महाराष्ट्र, मराठी माणूस पेटून उठला. सरकारच्या या जीआरचा कडाडून विरोध करत शिवसेना ठाकरे गट आणि मनसे या दोन पक्षांनी प्रामुख्याने विरोध दर्शवला, त्यानंतर राज्यातील इतरही पक्षांनी या निर्णयाला विरोध केला. त्याविरोधात आंदोलनाचाही इशारा दिला. अखेर व्यापक जनविरोध, विरोधी पक्षांची एकजूट पाहून फडणवीस सरकारने हिंदी सक्ती बाबतचा जीआर रद्द करत या निर्णयावरून तात्पुरती माघार घेतली आहे. सरकारचं पाऊल मागे पडल्यानंतर हा मराठीचा, मराठी अस्मिता, मराठी माणसाचा विजय असल्याचे सांगत शिवसेना ठाकरे गट आणि मनसेतर्फे आज (5 जुलै) एक विजयी मेळावा घेण्यात आला.
वरळी डोम सभागृहात हजारो नागरिक, कार्यकर्ते , नेते, पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये पार पडलेल्या या मेळाव्यात प्रथम मनसे अध्यक्ष राज ठाकरे व त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी उपस्थितांना संबोधित केलं. यावेळी राज ठाकरेंनी सर्व मुद्यांचा समाचार घेत तडाखेबंद भाषण केलं. हिंदी सक्ती आणि मराठीला मिळणारी दुय्यम वागणूक या मुद्यांना लक्ष्य करत राज ठाकरेंनी पुढचा धोका सांगितला. राज्यातील तमाम जनतेला सावध करत त्यांनी सतर्क राहण्याचा इशारा दिला. महाराष्ट्रातील तमाम मराठी लोकं आजं एकत्र आली आहेत. मात्र आता हेच सरकार राजकारण करून तुम्हाला जातीत विभागतील, जातीचं कार्ड खेळतील. जातीपातीत विभागायला सुरू करतील, असं सांगत राज ठाकरेंनी तमाम मराठी जनतेला एकजुटीचा, सावध राहण्याचा सल्ला दिला.
ठाकरेंची मुलं इंग्रजीत शिकले , त्याने काय नुकसान झालं ?
शिवसेना आणि मनसेच्या नेत्यांनी मराठीला दुय्यम वागणूक मिळाल्यावर निषेध केल्यानंतर सत्ताधारी पक्षातील अनेकांनी त्यांच्यावर टीका केली होती. ठाकरेंची पोरं इंग्रजीत शिकली असं म्हणत त्यांची खिल्ली उडवली होती. याही मुद्याचा राज ठाकरेंनी सडकून समाचार घेतला. ” आम्ही मराठी मीडियात शिकलो. आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली. होय. मग यांना मराठीचा पुळका कसा. बाळासाहेब ठाकरे आणि श्रीकांत ठाकरे हे इंग्रजी मीडियममध्ये शिकली आहेत. या दोघांवर मराठीबाबत शंका घ्याल का ?” असा रोखठोक सवालच त्यांनी केला. लालकृष्ण आडवाणी सेंट पॅट्रीक हायस्कूल ख्रिश्चन मिशनरीमध्ये शिकले. हिंदुत्वावर शंका घेऊ का त्यांच्या ? असंही त्यांनी विचारलं.
एक भाषा सर्वांना बांधून ठेवते
दक्षिण भारतात बघा. त्यांना कोण विचारत नाही. उद्या हिब्रू भाषेत शिकेल आणि मराठीचा कडवट अभिमान बाळगेल. काय अडचण आहे?असा थेट सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला. दाक्षिणात्य कलाकार इंग्रजी माध्यमात शिकले. एआर रहमान परवा एका व्यासपीठावर उभे होते. बाई तामिळ बोलत होती. अचानक हिंदी बोलायला लागली. एआर रहमानने बघितलं, हिंदी? आणि ते खाली उतरले. बाळासाहेब ठाकरे इंग्रजी माध्यमात शिकले. इंग्रजी वर्तमानपत्रात व्यंगचित्र काढलं. त्यांनी भाषेशी तडजोड केली नाही. म्हणे एक भाषा सर्वांना बांधून ठेवते. कोणती भाषा. काय वाकडं झालं. आपल्या सैन्यात मराठा, शीख, जाट, पंजाब, पॅराशूट, गडवाल रायफल, बिहार, महार रेजिमेंट, जम्मू काश्मीर, गोरखा रायफल आहे. लडाख स्काऊट, सिक्कीम स्काऊ आहे. इथल्या राज्याच्या रेजिमेंट आहे. शत्रू दिसल्यावर तूटून पडतात ना. मग भाषेचा प्रश्न येतो कुठे ? असा सवाल त्यांनी विचारला.
भाषावार प्रांत रचना त्याच कारणासाठी होती ना. या गोष्टी का सुरू केल्या, आता सांगून ठेवतो. आज मराठी म्हणून एकत्र आलात. महाराष्ट्रातील तमाम मराठी एकत्र आला आहे. याचं पुन्हा राजकारण करत तुम्हाला जातीत विभागतील. जातीचं कार्ड खेळतील. मराठी म्हणून तुम्हाला एकत्र येऊ देणार नाही. जातीपातीत विभागायला सुरू करतील असं राज ठाकरे म्हणाले.