Rajan Teli | दीपक केसरकरांना आवरा, भाजप नेत्यांनी काय कारवं हे त्यांनी सांगू नये, सिंधुदुर्गातून राजन तेलींचा इशारा

| Updated on: Aug 06, 2022 | 3:58 PM

दीपक केसरकर यांनी काल पत्रकार परिषदेत नारायण राणेंवर थेट आरोप केले. सुशांतसिंह राजपूत प्रकरणात आदित्य ठाकरेंची बदनामी करण्यात आली. यामुळे ठाकरे कुटुंबावर प्रेम करणारे लोक यामुळे दुखावले गेल्याचं वक्तव्य केसरकर यांनी केलं.

Rajan Teli | दीपक केसरकरांना आवरा, भाजप नेत्यांनी काय कारवं हे त्यांनी सांगू नये, सिंधुदुर्गातून राजन तेलींचा इशारा
दीपक केसरकर, राजन तेली
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

सिंधुदुर्ग । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या नेतृत्वात आणि नव्या निर्णयांमुळे राज्यातील जनता खुश आहे. दीपक केसरकरांनी उगाच भाजप नेत्यांनी काय करावं, असे सल्ले देऊ नये. मुख्यमंत्री साहेबांनी दीपक केसरकरांना (Deepak Kesarkar) आवरावं, अशी विनंती भाजप नेते राजन तेली यांनी केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजन तेली (Rajan Teli) हे नारायण राणे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. काल दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन नारायण राणेंवर टीका केल्यानंतर तळकोकणात हा वाद काही दिवस रंगणार असं वाटत होतं. मात्र केसरकरांनी वार करून देखील आक्रमक राणे परिवारातील कुठल्याच सदस्याने प्रतिक्रिया दिली नाही. आज नारायण राणे यांचे कट्टर समर्थक, माजी आमदार व भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी कणकवलीत पत्रकार परिषद घेऊन केसरकरांचा समाचार घेतला आहे. दीपक केसरकरांना आवरण्याची मागणी त्यांनी केली असून भाजपच्या नेत्यांनी काय बोलावे, काय करावे याच्याशी केसरकर यांचा संबंध नसल्याचे त्यांनी म्हटले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केसकर यांना समज देण्याची मागणी ही तेली यांनी केली आहे.

काय म्हणाले राजन तेली?

दीपक केसरकरांच्या वक्तव्यावर संताप व्यक्त करताना राजन तेली यांनी मुख्यमंत्र्यांना विनंती केली. ते म्हणाले, ‘ केसरकरांना जरा आवरा. गरज नसताना वातावरण खराब होत चाललंय. भाजपच्या नेत्यांनी काय बोलावं, काय करावं हे सांगण्याचे अधिकार दीपक केसरकरांना दिलेले नाहीत. दीपक केसरकरांनी आपल्या मतदार संघात काय सुरु आहे, याकडे लक्ष द्यावे. एकनाथ शिंदेंच्या गटात गेलेल्या प्रत्येक आमदाराचं आपापल्या मतदारसंघात उत्स्फूर्त स्वागत झालंय. त्यामुले माझी विनंती आहे की, सर्व आमदारांनी आपापल्या भागात हजार हजार कोटी रुपये घेऊन गेलेत.. महाराष्ट्रात एवढ्या चांगल्या प्रकारचं वातावरण आहे. आतापर्यंत जे निर्णय ठाकरे सरकारने घेतले नाहीत, एवढे ऐतिहासिक निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने घेतले आहेत. पेट्रोल-डिझेलचे दर कमी केलेत. सर्व सामान्य जनतेला सरकारकडून अपेक्षा आहे. राज्यातली जनता खुश असताना आज केसरकर वेगळ्या दिशेने वातावरण घेऊन जात आहेत. त्यांना थांबवण्याची गरज आहे. त्यांनी भाजपच्या कोणत्याही नेतृत्वार बोलू नये, अशी विनंती आहे.

केसरकरांची राणेंवर काय टीका?

दीपक केसरकर यांनी काल पत्रकार परिषदेत नारायण राणेंवर थेट आरोप केले. सुशांतसिंह राजपूत प्रकरणात आदित्य ठाकरेंची बदनामी करण्यात आली. नारायण राणेंच्या कुटुंबाकडून आदित्य ठाकरेंच्या बदनामीचा प्रयत्न झाला. नारायण राणेंच्या पत्रकार परिषदेत याचा वाटा फार मोठा होता. ठाकरे कुटुंबावर प्रेम करणारे लोक यामुळे दुखावले गेले. उद्धव साहेब आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट झाली. त्यानंतर कुटुंब प्रमुख कसा असावा हे नरेंद्र मोदींनी दाखवून दिलं, असं वक्तव्य दीपक केसरकरांनी केलं.