20 वर्षांनी एकत्र आले आता…, ठाकरे बंधूंबाबत आठवलेंचं मोठं भाकीत, नेमकं काय म्हणाले?
आज विजयी मेळावा पार पडला, या मेळाव्याला दोन्ही ठाकरे बंधू उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे उपस्थित होते, यावर आता रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हिंदी भाषेच्या मुद्द्यावरून राज्यात वातावरण चांगलंच तापलं होतं, पहिलीपासून हिंदी भाषा नको अशी भूमिका राज्यातील अनेक संघटनांची आणि पक्षाची होती. याविरोधात मनसेनं मोठं आंदोलन उभारलं, त्यानंतर या आंदोलनात शिवसेना ठाकरे गटानं देखील उडी घेतली. दरम्यान राज्य सरकारनं त्रिभाषा सूत्राचा जीआर रद्द केल्यानंतर आज मुंबईत विजयी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्याला दोन्ही ठाकरे बंधू शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे उपस्थित होते. यावर आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नेमकं काय म्हणाले आठवले?
20 वर्षांनी दोन्ही भाऊ एकत्र आले त्याचा आनंद आहे, मात्र याचा महायुतीला जास्त फायदा होईल, महाविकास आघाडीत फूट होऊन तिसरा गट निर्माण होईल. आम्ही सुद्धा मराठीप्रेमी आहोत, विजयी मेळावा घेण्याचा त्यांना अधिकार नाही, मुंबईत नॉन मराठी लोक जास्त आहेत. बाहेरून आलेल्या लोकांनी उद्योग धंदे टाकले, मराठी लोकांसोबतच बाहेरच्या लोकांचंही योगदान आहे. लहान मुलांना हिंदी शिकवणे योग्य नव्हते, त्यामुळे मराठी माणसांच्या भावना लक्षात घेऊन हा जीआर रद्द करण्यात आला, असं आठवले यांनी म्हटलं आहे.
दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी संजय राऊत यांच्यावर देखील निशाणा साधला. खुर्च्या खाली करा हे म्हणण्याचा अधिकार संजय राऊत यांना नाही , जनता सांगेल, निवडणूक लढा आणि घ्या. राज ठाकरेंना मत भेटत नाहीत, उद्धव ठाकरेंना शिंदेंनी धक्का दिला आहे. 4 लोक जाऊन थोबाडीत मारतात, जर असंच असेल तर पाकिस्तानच्या थोबाडीत जाऊन मारा, असं म्हणत यावेळी आठवले यांनी राज ठाकरे यांना देखील डिवचलं आहे.
दरम्यान यावेळी पुन्हा एकदा त्यांनी वंचित बहुजन आघाडीसोबत युतीवर प्रतिक्रिया दिली आहे. मी प्रकाश आंबेडक यांना साद दिली, मात्र ते ऐक्यसाठी निगेटिव्ह आहेत. बाळासाहेब जर सोबत आले तर माझं केंद्रातलं मंत्रिपद मी त्यांना द्यायला तयार आहे. समाजासाठी एकत्र आले पाहिजे, तर ताकद वाढेल. मी चार पावल मागे यायला तयार आहे, असं आठवले यांनी म्हटलं आहे.