
शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी दसरा मेळाव्यात बोलताना मोठा दावा केला होता, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मृतदेह दोन दिवस मातोश्रीवर ठेवण्यात आला होता, बाळासाहेब ठाकरे यांच्या हाताचे ठसे घेण्यात आले, असा दावा त्यांनी केला होता. दरम्यान कदम यांच्या या दाव्यानंतर आता वातावरण चांगलंच तापलं आहे. आरोप-प्रत्यारोपाला सुरुवात झाली आहे. कदम यांच्या दाव्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी कदम यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे, मी गद्दार आणि नमकहरामांना उत्तर देत नाही. ठाकरे कोण हे महाराष्ट्राला माहीत आहे. त्यामुळे गद्दार आणि हरामखोरांना उत्तर देत नाही, असं ठाकरे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान त्यानंतर आता कदम यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. या पत्रकार परिषदेमधून त्यांनी पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. त्यांनी अनिल परब यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. अनिल परब हे अर्धवट वकील असावेत. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी अज्ञानाचं प्रदर्शन केलं आहे. मी जे दसरा मेळाव्यात बोललो, त्यात मी डॉक्टरांचा उल्लेख केला होता. ते उपचार करत होते. ते त्यांचं म्हणणं आहे. अनिल परब पैशांसाठी त्या डॉक्टरांवर दावा टाकणार आहेत का? असा सवाल यावेळी कदम यांनी केला आहे.
दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, मी आज निर्णय घेतला आहे. या प्रकरणावर शासनाने सीबीआय चौकशी करावी. याचं पत्र मी सीएमला सोमवारी देणार आहे. दोन दिवस बॉडी का ठेवली? याची चौकशी करावी. म्हणजे दूध का दूध पानी का पानी होईल असं यावेळी कदम यांनी म्हटलं आहे.
कदम यांनी नेमका काय केला होता दावा?
शिवसेना शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात बोलताना कदम यांनी मोठा दावा केला होता, बाळासाहेबांचा मृतदेह दोन दिवस मातोश्रीवर होता, त्यांच्या हाताचे ठसे घेण्यात आले असं त्यांनी म्हटलं होतं, यावरून आता वातावरण चांगलंच तापलं आहे.