
Ramdas Kadam On Balasaheb Thackeray Death : शिवसेनेचे नेते तथा माजी मंत्री रामदास कदम यांनी 2 ऑक्टोबर रोजीच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात खळबळजनक विधान केले. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मृतदेह दोन दिवस मातोश्रीवर ठेवला होता, असा खळबळजनक दावा कदम यांनी केला. कदम यांच्या या दाव्यानंतर आता राज्याच्या राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. कदम यांच्या या विधानाचे राजकीय पडसाद उमटत आहेत. असे असतानाच आता रामदास कदम यांनी आज (3 ऑक्टोबर) पत्रकार परिषद घेऊन आणखी एक खळबळजनक दावा केला आहे. यावेळी त्यांनी खासदार शरद पवार यांचे नाव घेत मोठं विधान केलं आहे.
रामदास कदम यांनी पत्रकार परिषद घेऊन बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनावर पुन्हा एकदा भाष्य केले. “बाळासाहेब ठाकरे यांचे निधन कधी झाले होते, हे डॉक्टरांना विचारायला हवे. मी दसरा मेळाव्यात जबाबदारीने विधान केले आहे. मी माझ्या विधानावर ठाम आहे. मला प्रसिद्धी नको आहे. पण ही अतिशय गंभीर बाब आहे. आमच्या दैवताबाबत असं होत असेल तर आम्हाला दु:ख होणारच आहे,” अशा भावना यावेळी रामदास कदम यांनी व्यक्त केल्या. तसेच बाळासाहेब ठाकरे यांना भेटायला शरद पवार आले होते. मात्र त्यांनादेखील वर पाठवले नव्हते. त्यावेळी शरद पवार यांनी एक विधान केले होते. अरे मिलिंद बाळासाहेब ठाकरे यांच्या देहाला उद्धव का त्रास देत आहेत, असे त्यावेळी शरद पवार म्हणाले होते. शरद पवारांचे हे शब्द होते. मला अजूनही आठवत आहे. त्यावेळी मी मातोश्रीमध्येच होतो, असा खळबळजनक दावाही कदम यांनी यावेळी केला.
उद्धव ठाकरे यांनी हे पाप केले आहे. उशिरा का होईना पण महाराष्ट्रातील जनतेला उद्धव ठारे यांचे हे धंदे कळायला हवेत. माझ्याकडे अनेक गोष्टी आहेत. मी त्या बोलणार नाही. पण वेळ पडली तर मी सोडणार पण नाही. उद्धव ठाकरे यांच्याबाबत बाळासाहेब ठाकरे काय-काय बोललेले आहेत, ते माझ्या मनात आहे. मला ते सगळं बोलायला लावू नका, असा इशाराही रामदास कदम यांनी दिला.
पुढे बोलताना मी मेळाव्यात जे अनावधानाने बोललो ती चूक नाही. माझे ते विधान वास्तव आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाल्यानंतर डॉक्टरांनी पत्रकार परिषद घेऊन का सांगितले नाही. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या हतांचे ठसे घेतले आहेत. उद्धव ठाकरे यांनी त्यांचा बछडू आदित्य ठाकरे यांच्या डोक्यावर हात ठेवून सांगा बाळासाहेब ठाकरे यांचे ठसे घेतले होते की नाही ते सांगावे, असे थेट आव्हान रामदास कदम यांनी दिले.
मी भगव्या झेंड्याचा शिपाई आहे. मी बाळासाहेब ठाकरे यांचा सच्चा शिपाई आहे. उद्धव ठाकरे काय आहेत, ते हळूहळू महाराष्ट्राला समजेल. उद्धव ठाकरे यांनी समोर येऊन बोलावे. मग मीदेखील बोलतो. एकदा होऊनच जाऊदे, असे म्हणत रामदास कदम यांनी दंड थोपटले आहेत. त्यामुळे आता ठाकरे गट यावर काय प्रतिक्रिया देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.