
मी भाजपचा भक्त आहे, मी मोदींचा भक्त आहे.. असं वक्तव्य करून अभिनेते आणि दिग्दर्शक महेश कोठारे चांगलेच चर्चेत आले आहेत. बोरिवलीत आयोजित केलेल्या एका दिवाळी पहाट कार्यक्रमात कोठारेंनी मोदींचं भरभरून कौतुक केलं. त्याचसोबत मुंबईत भाजपचाच महापौर होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यांच्या या वक्तव्यावरून शिवसेना खासदार संजय राऊतांनी निशाणा साधला. “महेश कोठारे नक्की मराठीच आहेत ना? मला शंका वाटते. प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. पण तुम्ही कलाकार आहात आणि तुमचे चित्रपट फक्त भाजपच्या लोकांनी पाहिलेले नाहीत”, अशी टीका राऊतांनी केली. त्यानंतर आता भाजप नेते रमेश पाटील आणि महेश कोठारे यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. तुम्हाला ईडीची नोटीस आली का, असा प्रश्न त्यांनी कोठारेंना विचारला आहे.
रमेश पाटील- आम्ही तुमचे खूप मोठे फॅन आहोत. मी भाजपचा भक्त आहे, मोदींचा भक्त आहे, असं तुम्ही म्हणालात. तुम्हाला या विषयावर ईडीची नोटीस तर आली नाही ना?
महेश कोठारे- नाही नाही (हसतात). माझं मत असू शकतं ना? माझं मत का नसू शकतं? ज्या मोदींनी या देशासाठी इतकं मोठा काम केलंय, इतकी वर्षे जे इन्फ्रास्ट्रक्चर झालं नव्हतं, ते आता झालेलं आहे. त्याची कोणीतरी दखल घ्यायची नाही का? ज्या माणसाने आपलं सर्वस्व त्याच्यासाठी वाहिलंय. ते स्वत:साठी काही करत नाहीत, सर्व देशासाठी करत आहेत. त्यांचं कौतुक करण्यात काय चुकलं?
रमेश पाटील- तुम्ही काही भाजपविरोधात नाहीत?
महेश कोठारे- भाजपविरोधात काय, मी भाजप भक्त आहे. हे मी आज ठामपणे म्हणतो. मी मोदीजींचाही भक्त आहे.
रमेश पाटील- संजय राऊतांनी तुमच्या वक्तव्यावर म्हटलं की तुम्हाला तात्या विंचू रात्री येऊन चावेल.
महेश कोठारे- ते त्यांचं मत आहे. त्यात मी काय करू? त्यांचं मत त्यांनी मांडलं आणि माझं मत मी मांडलं. विषय संपला.
मी भाजपचा भक्त आहे, मी मोदींचा भक्त आहे.. याचा पुनरुच्चार कोठारेंनी या ऑडिओ क्लिपमध्ये केला आहे. टीव्ही9 मराठी या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही.