‘मी मोदी भक्त’ म्हणणाऱ्या महेश कोठारेंना संजय राऊतांचा टोला; म्हणाले “रात्री तात्या विंचू..”
बोरिवलीतील दिवाळी पहाट कार्यक्रमात महेश कोठारेंनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक केलं होतं. इतकंच नव्हे तर मी भाजपचा भक्त आहे, मी मोदीजींचा भक्त आहे, असं त्यांनी म्हटलं होतं. त्यावरून आता संजय राऊतांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

दिग्दर्शक आणि अभिनेते महेश कोठारे यांनी सोमवारी एका दिवाळी पहाट कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भरभरून कौतुक केलं. मी मोदीजींचा भक्त आहे, मी भाजपचा भक्त आहे, असं ते म्हणाले. इतकंच नव्हे तर महापालिका निवडणुकीत मुंबईत भाजपचाच कमळ फुलेल, मुंबईत भाजपचा महापौर होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महेश कोठारे यांचं हे वक्तव्य सोमवारी दिवसभर चर्चेत होतं आणि त्यावर विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या होत्या. आता आज (मंगळवार) पत्रकार परिषदेत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
“महेश कोठारे नक्की मराठीच आहेत ना? मला शंका वाटते. प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. पण तुम्ही कलाकार आहात आणि तुमचे चित्रपट फक्त भाजपच्या लोकांनी पाहिलेले नाहीत”, अशी टीका संजय राऊतांनी पत्रकार परिषदेत केली. यानंतर ते मस्करीत म्हणाले, “तुम्ही असं काही बोलला असाल तर तुम्हाला तात्या विंचू चावेल. रात्री येऊन तुमचा गळा दाबेल.”
बोरिवलीत प्रवीण दरेकरांकडून दिवाळी पहाटचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात कोठारेंनी “मी मोदीजींचा भक्त आहे” असं विधान केलं. “जेव्हा मी पियुष गोयल यांच्या प्रचारासाठी आलो होतो. तेव्हा मी म्हटलं होतं की ते खासदार निवडून देत नाहीत तर मंत्री निवडून देत आहेत. आता जर या विभागातून नगरसेवक नसेल तर महापौर निवडला जाईल,” असंही कोठारे पुढे म्हणाले.
याआधी अंबरनाथमध्ये धर्मवीर आनंद दिघे नाट्यमंदिराच्या लोकार्पण सोहळ्यात कोठारेंनी उपमुख्यमंत्री एकना शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कामाचं कौतुक केलं होतं. “आपल्या सर्वांचे लाडके, धडाकेबाज नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि झपाटलेला आमचा खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांतून साकार झालेलं हे रंगमंच पाहून मी भारावून गेलो आहे. तुम्ही कलाकाराला इथे स्थान दिलं, हे पाहून आम्ही खूप खुश आहोत. इथे कलाकारांचे पेंटिंग्स बघून मी भारावून गेलो. श्रीकांतजी.. तुम्ही कायम झपाटलेले राहा आणि एकनाथजी.. तुम्ही जे काम करता ते धडाकेबाज पद्धतीनेच करता. या नाट्यमंदिराचं उद्धाटनदेखील इतकं दण्यात केलंय. असं मी याआधी पाहिलं नव्हतं. आम्हा कलावंतांसाठी तुम्ही खूप काही कराल,” अशी अपेक्षा कोठारेंनी या कार्यक्रमात व्यक्त केली होती.
