मी मोदींचा मोठा भक्त..; महेश कोठारेंचं मोठं विधान चर्चेत
बोरिवलीत प्रवीण दरेकरांकडून दिवाळी पहाट कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमाला मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते आणि दिग्दर्शक महेश कोठारे उपस्थित होते. या कार्यक्रमात त्यांनी मोदींबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे.

मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते महेश कोठारे नेहमीच त्यांची राजकीय मतं मोकळेपणे मांडत असतात. बोरिवलीत प्रवीण दरेकरांकडून दिवाळी पहाटचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात कोठारेंनी “मी मोदीजींचा भक्त आहे” असं विधान केलं. मी भाजपचा भक्त आहे, मी मोदीजींचा भक्त आहे, मुंबईत नक्कीच कमळ फुलेल, असं ते पुढे म्हणाले. महेश कोठारे यांनी याआधीही भारतीय जनता पक्षाच्या समर्थनात वक्तव्ये केली आहे. आता पुन्हा एकदा त्यांच्या वक्तव्याने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. “जेव्हा मी पियुष गोयल यांच्या प्रचारासाठी आलो होतो. तेव्हा मी म्हटलं होतं की ते खासदार निवडून देत नाहीत तर मंत्री निवडून देत आहेत. आता जर या विभागातून नगरसेवक नसेल तर महापौर निवडला जाईल,” असंही कोठारे पुढे म्हणाले.
काय म्हणाले प्रवीण दरेकर?
या कार्यक्रमात प्रवीण दरेकर म्हणाले, “आपलं घर त्या ठिकाणी सोनं झाल्यानंतर दिवाळी पहाटला गेलो तर आपल्या लोकांमध्ये आल्याचा भास होतो. हेच यश या आपल्या कार्यक्रमाचं आहे आणि दिवाळी पहाट कशासाठी आपण करतो? आपल्या आयुष्यात वर्षभरात सुख-दुःख येत असतात आणि अशा वेळेला एका नव्या उमंग, नव्या उमेदीने आपल्या आयुष्यामध्ये वाटचाल करण्यासाठी आत्मविश्वास देणारा हा कार्यक्रम असतो.”
“आम्ही दिवाळी पहाट सोडत नाही. पंधरा वर्षे झाली, आम्ही मनसेत होतो तेव्हा पण दिवाळी पहाट होती, शिवसेनेत होतो तेव्हा पण दिवाळी पहाट होती आणि आता भाजपमध्ये असतानाही दिवाळी पहाट आहे. मराठी माणसांकडे पाठ केली की आपली कशी वाट लागते हे सगळ्या मुंबईला त्या ठिकाणी पाहिलं आहे,” असं म्हणत त्यांनी शिवसेना आणि मनसेला टोला लगावला आहे.
कोठारेंकडून शिंदेंचंही कौतुक
अंबरनाथमध्ये धर्मवीर आनंद दिघे नाट्यमंदिराचं रविवारी दिमाखदार सोहळ्यात लोकार्पण करण्यात आलं. या लोकार्पण सोहळ्याला ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक महेश कोठारे, मकरंद अनासपुरे, विजय गोखले, विजय पाटकर, ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी, अलका कुबल, ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की, अभिनेता सिद्धार्थ जाधव, संतोष जुवेकर असे अनेक कलाकार उपस्थित होते. या कार्यक्रमातही महेश कोठारेंनी उपमुख्यमंत्री एकना शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कामाचं कौतुक केलं.
“आपल्या सर्वांचे लाडके, धडाकेबाज नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि झपाटलेला आमचा खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांतून साकार झालेलं हे रंगमंच पाहून मी भारावून गेलो आहे. तुम्ही कलाकाराला इथे स्थान दिलं, हे पाहून आम्ही खूप खुश आहोत. इथे कलाकारांचे पेंटिंग्स बघून मी भारावून गेलो. श्रीकांतजी.. तुम्ही कायम झपाटलेले राहा आणि एकनाथजी.. तुम्ही जे काम करता ते धडाकेबाज पद्धतीनेच करता. या नाट्यमंदिराचं उद्धाटनदेखील इतकं दण्यात केलंय. असं मी याआधी पाहिलं नव्हतं. आम्हा कलावंतांसाठी तुम्ही खूप काही कराल,” अशी अपेक्षा कोठारेंनी या कार्यक्रमात व्यक्त केली.
