मुंबई, रायगडला रेड अलर्ट, पुण्यात ऑरेंज अलर्ट, राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज

राज्यात मान्सून सक्रिय झाला आहे. यामुळे आता पुढील काही दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. राज्यात चार-पाच दिवस पाऊस सक्रीय असणार आहे.

मुंबई, रायगडला रेड अलर्ट, पुण्यात ऑरेंज अलर्ट, राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज
rain
| Updated on: Jun 14, 2025 | 8:02 AM

IMD weather forecast : राज्यात मान्सून जोर धरणार आहे. कोकणात शनिवारी मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मुंबईसह रायगड जिल्ह्याला आज हवामान विभागाने पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात रविवारी १५ जून रोजी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. पुणे आणि घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट दिला आहे. उर्वरित राज्यात पाऊस पडणार आहे. राज्यात अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार सरी कोसळणार आहे.

मुंबईत जोरदार वारे वाहणार

राज्यात मान्सून सक्रिय झाला आहे. यामुळे आता पुढील काही दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. राज्यात १४ ते १९ जूनदरम्यान कोकणात अति मुसळधार पावसाचा धोका कायम राहणार आहे. मुंबईत आज ५० ते ६० किमी/तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान तज्ज्ञ सुषमा नायर यांनी व्यक्त केला आहे.

भारतीय हवामान खात्याने पुणे शहर आणि जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. शुक्रवारी पुण्यात सकाळपासून ढगाळ वातावरण होते. त्यानंतर दुपारनंतर मुसळधार पावसाला सुरुवात झाली. सायंकाळी उशीरा उपनगरांमध्ये जोरदार सरी कोसळल्या. मुंढवा, खराडी, हडपसर, फुरसुंगी, कोंढवा, कात्रज, धनकवडी, आंबेगाव नन्हे, बिबवेवाडी, सिंहगड रस्ता, कोथरूड, बावधन, औंध, बोपोडी, पाषाण या भागांमध्ये विजेच्या गडगडाटासह पाऊस झाला.

विदर्भ, मराठवाड्यातही अनेक ठिकाणी पाऊस झाला. मराठवाड्यात दोन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाल्याने फळगाबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या कन्नड तालुक्यातील भीलदरी शाफियाबद गावात मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे शेतीमध्ये सगळीकडे तळे साचली. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. बीड जिल्ह्यातही वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यामध्ये अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाले. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात शुक्रवारी सायंकाळी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. त्यामुळे शहरातील रस्ते आणि नाल्याचे पाणी दुधडी भरून वाहत होते.

सिंधुदुर्गातील देवगड तालुक्यामध्ये शुक्रवारी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. देवगडमध्ये गेल्या 24 तासांत तब्बल 224 मिमी पावसाची नोंद झाली. तालुक्यातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले होते.