
भाजपात असलेल्या आमदार राणाजगतित सिंह यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश देवून उमेदवारी दिली गेलीय. त्यामुळे जिल्ह्यात तुम्ही आता राष्ट्रवादीचं वर्चस्व वाढवणार का? या प्रश्नावर अर्चना पाटलांच्या उत्तरानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. धाराशीव लोकसभेत 2019 ला शिवसेनेचे ओमराजे निंबाळकरांविरुद्ध तेव्हा राष्ट्रवादीत असलेल्या राणा जगजितसिंहांमध्ये लढत झाली होती. निंबाळकरांचा १ लाख २७ हजारांनी विजय झाला. तर राणा जगजितसिंह पराभूत झाले होते. यंदा धाराशीवमध्ये निंबाळकर ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार आहेत. तर निंबाळकरांविरोधात भाजपात असलेल्या राणा जगजितसिंहांच्या पत्नी अर्चना पाटलांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करत उमेदवारी घेतलीय.
धाराशीव लोकसभेत 3 जिल्ह्यातल्या विधानसभांचा समावेश आहे. धाराशीव जिल्ह्यातील उमरगा, तुळजापूर, धाराशीव आणि परांडा या 4 विधानसभा, लातूर जिल्ह्यातील औसा विधानसभा आणि सोलापूर जिल्ह्यातील बार्शीचा मतदारसंघ अशा 6 विधानसभा धाराशीव लोकसभेत येतात. यापैकी परांडा आणि उमरग्यात शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार आहेत. तुळजापूर आणि औसा या 2 ठिकाणी भाजपचे आमदार, धाराशीवमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आहेत. तर बार्शीत अपक्ष आमदार जिंकून आले आहेत.
याआधी युतीत धाराशीवची जागा शिवसेना, तर आघाडीत राष्ट्रवादी जागा लढवत होती. मविआत शरद पवारांच्या राष्ट्रवादी ठाकरेंचे विद्यमान खासदार असल्यामुळे ही जागा त्यांना सोडली. तर इकडे युतीत शिंदेंच्या शिवसेनेची जागा अजितदादांच्या राष्ट्रवादीला मिळालीय. मात्र उमेदवारावरुन सत्ताधारी विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत नातं-गोत्यांसह अनेक ठिकाणची समीकरणंही रंजक आहेत.