Maharashtra Elections 2025 : नगरपरिषद आणि नगरपंचायतीसाठी राज्यातील बड्या नेत्यांची प्रतिष्ठापणाला, कोणाचा मुलगा तर कोणाची बायको, बहीण, भावजई निवडणुकीच्या मैदानात…

Maharashtra Local Body Elections 2025 : नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या मतदानासाठी आता अवघे काही तास राहिले आहेत. राज्यातील बड्या नेत्यांची प्रतिष्ठा या निवडणुकीमध्ये पणाला लागली आहे. जोरदार प्रचार केला जात आहे.

Maharashtra Elections 2025 : नगरपरिषद आणि नगरपंचायतीसाठी राज्यातील बड्या नेत्यांची प्रतिष्ठापणाला, कोणाचा मुलगा तर कोणाची बायको, बहीण, भावजई निवडणुकीच्या मैदानात...
Municipal Council and Municipal Panchayat Election
Updated on: Dec 01, 2025 | 4:17 PM

राज्यात उद्या नगरपरिषद आणि नगरपंचायतीसाठी मतदान प्रक्रिया होणार आहे. आज प्रचाराचा शेवटचा दिवस असून या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी केली. यादरम्यान महाविकास आघाडी किंवा महायुती म्हणून न लढता स्थानिक पातळीवर निर्णय घेण्यात आली. कुठे युती तर कुठे थेट विरोधात निवडणुका लढल्या जात आहेत. अनेक नगरपरिषद आणि पंचायत समितींमध्ये राज्यातील बड्या नेत्यांचे नातेवाईक निवडणूक लढताना दिसत आहेत. नेते मंडळींकडूनही आपल्या कुटुंबातील सदस्याचा विजय व्हावा, याकरिता प्रयत्ने केली जात आहेत. संभाजीनगर-सिल्लोड नगरपरिषदेत अब्दुल सत्तार यांचा मुलगा समीर सत्तार हा निवडणुकीच्या मैदानात उतरला आहे. मुलाच्या गळ्यात विजयाची माळ पडावी, याकरिता अब्दुल सत्तार यांच्याकडून तारेवरची कसरत केली जात आहे.

वैजापूरचे आमदार रमेश बोरणारे यांचे बंधू संजय बोरणारे निवडणुकीच्या मैदानात आहेत. परभणीच्या पाथरीत बाबाजानी दुर्राणी यांचे पुत्र जुनेद खान दुर्राणी कॉंग्रेसकडून मैदानात उतरले आहेत. पाथरी मतदार संघात बाबाजानी दुर्राणी यांचे मागील अनेक वर्षांपासून वर्चस्व बघायला मिळते. त्यामध्येच आता त्यांचा मुलगा जुनेद खान दुर्राणी नशीब आजमावत आहे. ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची बनली असून सर्वांच्या नजरा या निवडणुकीकडे आहेत.

परभणीच्या गंगाखेड येथे माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे यांच्या बहीण उर्मिला केंद्रे मुंडे निवडणुकीच्या मैदानात आहेत. धनंजय मुंडे यांनी स्वत: उर्मिला केंद्रे यांचा प्रचार केला आणि मोठे शक्तीप्रदर्शन केले. उर्मिला केंद्रे यांचे पती मधुसूदन केंद्रे यांचे गंगाखेड मतदार संघात वर्चस्व आहे. अनेक वर्षांपासून ते गंगाखेडच्या सक्रिय राजकारणात आहे. त्यांनी गंगाखेडचे आमदार म्हणूनही काम केले आहे.

आमदार संतोष बांगर यांच्या भावजाई रेखा श्रीराम बांगर या नगराध्यक्षपदासाठी मैदानात उतरल्या आहेत. हदगाव माजी खासदार सुभाष वानखेडे यांच्या सूनबाई रोहिणी भास्कर वानखेडे या हदगाव नगरपरिषदेसाठी नगरध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मैदानात आहेत. अंबाजोगाई येथे भाजपाच्या आमदार नमिता मुंदडा यांचे सासरे नंदकिशोर मुंदडा स्थानिक आघाडीकडून नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत.

अंबड भाजपा खासदार नारायण कुचे यांचे पुतणे उज्ज्वल कुचे हे निवडणुकीच्या मैदानात आहेत. गेवराई माजी आमदार लक्ष्मण पवार यांच्या भावजई गीता पवार यांना भाजपाकडून निवडणुकीच्या मैदानात उतरवण्यात आले. बीड अजित पवार यांच्या गटातून भाजपात दाखल झालेल्या योगेश क्षीरसागर यांच्या पत्नी सारिका क्षीरसागर यांना भापजाने नगरसेवक पदासाठी तिकिट दिले असून त्या देखील निवडणुकीच्या मैदानात आहेत.