
Republic Day 2026 : संपूर्ण देशात आज 77 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या दिवशी देशभरात शासकीय कार्यालये, वेगवेगळ्या संस्थांमध्ये ध्वजवंदन करण्यात आले. महाराष्ट्रातही वेगवेगळ्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी त्या-त्या जिल्ह्यांच्या शासकीय कार्यालयांत ध्वजवंदन करून प्रजासत्ताक दिन साजरा केला. परंतु नाशिकमध्ये ध्वजवंदनानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी केलेल्या भाषणामुळे नवा वाद पेटला आहे. त्यांनी आपल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेतल्याने वन विभागाच्या माधवी जाधव या महिला कर्मचाऱ्याने आक्षेप व्यक्त केला आहे. संताप व्यक्त करत महाजन यांच्याकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव पुसण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा, गंभीर आरोप केला. तसेच वेळप्रसंगी मी मातीकाम करेन, मला निलंंबित करा पण बाबासाहेबांची ओळख मी पुसू देणार नाही, असा निर्धारही जाधव यांनी व्यक्त केला आहे. हे प्रकरण राज्यभरात चर्चेत आल्यानंतर गिरीश महाजन यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.
गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेतले नाही, असा दावा माधवी जाधव यांनी केला आहे. त्यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओत ‘जे संविधानाला कारणीभूत आहेत. त्यांनाच तुम्ही संपवायला निघाले आहात. वेळ आली तर मी वाळूच्या गाड्या उचलेन, मी माती काम करेन पण मी बाबासाहेब आंबेडकर यांची ओळख पुसू देणार नाही. मला निलंबित करायचं असेल तर करा,’ असा संताप माधवी जाधव यांनी व्यक्त केला.
पुढे बोलताना बाबासाहेब आंबेडकर यांना संपवायचं काम करायचं नाही, असा इशाराही या महिला कर्मचाऱ्याने दिला. ही महिला कर्मचारी रागात बोलत असताना तिथे महाराष्ट्र पोलीस आले. पोलीस दलातील एका वरिष्ट महिला अधिकाऱ्याने माधवी जाधव यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर माधवी यांनी ‘मॅडम तुम्हीसुद्ध संविधानामुळेच आहात, पालकमंत्रीसुद्धा संविधानामुळेच आहेत,’ असे म्हणत गिरीश महाजन यांच्यावर आक्षेप घेतला. तसेच ‘जे लोकशाहीला, संविधानाला कारणीभूत नाहीत त्यांची नावं वारंवार घेतली गेली. परंतु जे प्रजासत्ताकदिनाचा मानकरी आहेत त्यांचं नाव का नाही घेतलं’ असा संतापजनक सवालही माधवी जाधव यांनी केला.
माधवी जाधव यांच्या या संतापाची दखल माध्यमांनी घेतली. तसेच त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रकरण वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या. त्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेण्याचे माझ्याकडून अनावधानाने राहिले असेल. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेण्याचा माझा कुठलाही हेतू नव्हता. मी फक्त घोषणा दिल्या. भारत माता की जय, वंदे मातरम, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा दिल्या,’ असे महाजन यांनी सांगितले. तसेच कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगीरी व्यक्त करतो, असेही पुढे महाजन म्हणाले