महापालिका निवडणुकांच्या हालचालींना वेग, निवडणूक आयुक्त थेट पालिकेत, दिवसभर बैठका; नेमकं काय घडलं?
राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांच्याकडून आज मुंबई महापालिकेच्या निवडणूकपूर्व तयारीच्या कामांचा आढावा घेण्यात आला आहे, यासाठी बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं.

राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांच्याकडून आज मुंबई महापालिकेच्या निवडणूकपूर्व तयारीच्या कामांचा आढावा घेण्यात आला आहे. मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये त्यांनी निवडणूकपूर्व कामाचा आढावा घेतला. सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने केलेली पूर्वतयारी परिपूर्ण असल्याचे नमूद करत, यावेळी राज्य निवडणूक आयोगाच्या वतीनं समाधान व्यक्त करण्यात आलं आहे.
या बैठकीला मुंबई महापालिकेचे आयुक्त तसेच प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी, कोकण विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारी आंचल सूद गोयल, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्यासह संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी विशेष कार्य अधिकारी (निवडणूक) विजय बालमवार यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे निवड आयुक्तांना निवडणूकपूर्व तयारी कामांची माहिती दिली.
मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील एकूण मतदार संख्या व मतदान केंद्र, मतदार यादी विभाजन, प्रस्तावित मतदान केंद्रांचे वर्गीकरण, आवश्यक मतदान यंत्रे, मतदान यंत्रे साठवणूक व्यवस्था, निवडणूक साहित्य, मतदान केंद्रावरील सोयी-सुविधा, निवडणुकीसाठी आवश्यक अधिकारी – कर्मचारी वर्ग आदी विविध विषयांचा यावेळी दिनेश वाघमारे यांनी आढावा घेतला.
यावेळी बोलताना राज्य निवडणूक आयुक्तांनी म्हटलं की, बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने निवडणुकीसाठी केलेली पूर्वतयारी परिपूर्ण आहे. मतदान केंद्रांवरील सुविधा वाढवून त्याची प्रभावी जनजागृती करण्यात यावी, जेणेकरून मतदानाची टक्केवारी वाढेल. मागील सार्वत्रिक महानगरपालिका निवडणुकीदरम्यान आलेल्या अडचणींचे निराकरण कशा प्रकारे होईल, याचा विचार करून यंदा अधिक सक्षम उपाययोजना राबवाव्यात. मतदान प्रक्रिया सुरळीत व पारदर्शक पार पाडावी, यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलावीत. सर्वांनी पारदर्शक व निर्भयपणे कामकाज करावे. विविध यंत्रणांमध्ये योग्य समन्वय साधून कामकाज सुरळीत व प्रभावीरितीने पूर्ण होईल, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश यावेळी राज्य निवडणूक आयुक्त वाघमारे यांनी दिले आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता घडामोडींना वेग आल्याचं पहायला मिळत आहे.
