शिवरायांबद्दलचे आक्षेपार्ह विधान खपवून घेणार नाही; रितेश देशमुखनं धीरेंद्र शास्त्रींना फटकारलं

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुखने छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह बोलणाऱ्यांवर टीका केली आहे. त्याने 'शिवरायांबद्दलचे आक्षेपार्ह विधान खपवून घेणार नाही' असे म्हणत तंबी दिली आहे.

शिवरायांबद्दलचे आक्षेपार्ह विधान खपवून घेणार नाही; रितेश देशमुखनं धीरेंद्र शास्त्रींना फटकारलं
Riteish Deshmukh
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Apr 26, 2026 | 8:20 AM

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री आणि आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे सध्या संपूर्ण राज्यात संतापाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुखने आपली भूमिका स्पष्ट करत महाराजांचा अवमान करणाऱ्यांना कडक शब्दांत फटकारले आहे. धीरेंद्र शास्त्री यांनी नागपूरमधील एका कार्यक्रमात शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्याबद्दल एक ऐतिहासिक किस्सा सांगत त्यांच्यात गुरु-शिष्याचे नाते असल्याचा दावा केला होता. तर दुसरीकडे आमदार संजय गायकवाड यांनी महाराजांचा एकेरी उल्लेख करणाऱ्यांना हिंसक इशारा दिला होता. या दोन्ही प्रकरणांमुळे निर्माण झालेल्या वादावर रितेशने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाला रितेश?

रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख सध्या त्यांच्या आगामी ‘राजा शिवाजी’ (किंवा जय शिवाजी) या भव्य मराठी चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी महाराष्ट्रभर फिरत आहेत. याच दौऱ्याचा एक भाग म्हणून त्यांनी भिवंडीतील मराडे पाडा येथील शिवक्रांती प्रतिष्ठानच्या छत्रपती शिवाजी महाराज मंदिर शक्तीपीठाला भेट दिली आणि महाआरतीमध्ये सहभाग घेतला. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना रितेशने स्पष्ट केले की, महाराजांबद्दल वापरलेले कोणतेही अपशब्द किंवा आक्षेपार्ह विधाने शिवप्रेमी कधीही खपवून घेणार नाहीत. जरी त्याने विशिष्ट विधानांची सखोल माहिती नसल्याचे नमूद केले असले, तरी महाराजांच्या सन्मानाला धक्का लावणाऱ्या प्रवृत्तींचा त्याने जाहीर निषेध केला.

यावेळी रितेशने भिवंडीतील भव्य मंदिराचे आणि तिथल्या कलाकृतींमधून मांडल्या गेलेल्या शिवइतिहासाचे मनापासून कौतुक केले. महाराजांवरील प्रेमापोटी इतके सुंदर शक्तीपीठ उभारल्याबद्दल त्याने शिवक्रांती प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आणि भविष्यातही या ठिकाणी आपण वारंवार येत राहू, असा विश्वास व्यक्त केला. १ मे रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून प्रदर्शित होणाऱ्या आपल्या चित्रपटाच्या निमित्ताने त्याने पुन्हा एकदा शिवरायांप्रती आपली निष्ठा आणि आदराची भावना व्यक्त केली आहे.

धीरेंद्र शास्त्री काय म्हणाले होते?

शिवाजी महाराज युद्ध करून थकले तेव्हा एक दिवस ते समर्थ रामदास स्वामींकडे गेले आणि आपला मुकूट उतरवून रामदास स्वामींना दिला. आता हे राज्य तुम्ही सांभाळा अशी विनंती केली. त्यावर रामदास स्वामींनी हसून मी राज्य चालवतो, तुम्ही अंमलबजावणी करा असं म्हटलं असा दावा धीरेंद्र शास्त्रींनी केला.

Follow Us